मराठा वॉर मेमोरियल हॉस्टेलच्या प्रगतीसाठी आम्ही प्रयत्नशील असून, या हॉस्टेलच्या विकासासाठी, त्याचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी व्यक्तीश: प्रयत्न करीत असून मी जेथे असेन तेथे मला कळवा, मी तुमच्या सोबत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सेंटर कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी केले.
हॉस्टेलच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ या, असेही ते यावेळी म्हणाले. ‘यशोगाथा’ या हॉस्टेलमधील माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी व इतिहासाची माहिती सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळीच्या कार्यक्रम समारंभात ते बोलत होते. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील ‘तडका ‘ येथे हा कार्यक्रम दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाला.
सहा महिन्यांपूर्वी संजय पाटील यांचे हॉस्टेलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन करण्याबाबतचे पत्र मला मिळाले होते, असे नमुद करीत कमांडंट मुखर्जी म्हणाले की, त्यानंतर हा कार्यक्रम करण्याचे मी त्यांना कळविले होते व त्यानुसार इतक्या मोठया संख्येने हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी सहभागी होत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. यापुढे हॉस्टेलच्या प्रत्येक चांगल्या कामासाठी आपले सहकार्य असेल, असे आश्वासनही मुखर्जी यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या व हॉस्टेलच्या विकासासाठी काय करता येईल, याबाबत कमांडट मुखर्जी यांनी आजी व माजी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
1935 मध्ये या हॉस्टेलची स्थापना झाली असून आजवर येथील 100च्या आसपास विद्यार्थ्यांनी कमिशन घेऊन सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी बनण्याचा मान मिळवला आहे. त्यापैकी कर्नल अरुण जाधव, कर्नल बजरंग सकपाळ, कर्नल जगदीश गाडेकर, कर्नल सुभाष सावंत, मेजर वसंत जाधव आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याचबरोबर हॉस्टेलचे माजी पीटी टिचर , हॉस्टेल व्यवस्थापक, शिक्षक, कुक, स्टाफ आदींनीही या कार्यक्रमास हजेरी लावली.
त्याशिवाय जेसीओ व एनसीओ सुद्धा आहेत. हॉस्टेलमधील 95 टक्के विद्यार्थी हे सैन्य दलात भरती होत असत, असे या कार्यक्रमाचे समन्वयक संजय पाटील येथे बोलताना म्हणाले. त्याचबरोबर बाहेरील जगातही डॉ. मधुकर जगताप, डॉ. नेताजी मुळीक, विश्वास मोटे हे सहाय्यक आयुक्त, मुंबई महानगरपालिका, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. शामराव घराळ यांच्यासह अनेकांनी हॉस्टेलचे नाव रोशन केले आहे. 1991-92 मध्ये सुरु झालेल्या गर्ल्स हॉस्टेलच्या चारहून अधिक मुली डॉक्टर झाल्या आहेत. तर काही सॉफटवेअर इंजिनियर, एअर हॉस्टेस आदी आहेत.
या कार्यक्रमानिमित्त सेंटर कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचे प्रथम पुष्पगुच्छ देऊन संजय पाटील यांनी सत्कार केला व कर्नल अरूण जाधव, कर्नल सुभाष सावंत, डॉ. मधुकर जगताप, कमांडंट तानाजी पवार, मधुकर रसाळ, विश्वास मोटे व संजय पाटील आदींनी मानपत्र भेट दिली.
दि. 26 व 27 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र व कर्नाटकाच्या विविध जिल्हयातून माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी आल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर मराठा वॉर मेमोरियल हॉस्टेल व मराठा लाईट इन्फंट्री सेंटरचा परिसर गजबजला होता.
आज या हॉस्टेलमुळेच आम्ही या ठिकाणी पोहोचलो असून या कार्यक्रमास परवानगी दिल्याबद्दल सेंटर कमांडंट व संपूर्ण एमएलआयआरसी बेळगावचे संजय पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या आठवणींचा ठेवा घेऊन हॉस्टेलचे सर्व आजी व माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी सेंटरचे आभार मानले.