हंचनाळ (ता. हुक्केरी जि. बेळगाव) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील हजरत सईद गुलाबशा वाली दर्गा अन्यत्र हटवू नये. या ठिकाणचा महामार्गाचा मार्ग एक तर बदलण्यात यावा अथवा दर्गा वरून फ्लाय ओव्हर ब्रिज बांधावा, अशी मागणी हजरत सईद गुलाबशा वाली दर्गा कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हंचनाळ (ता. हुक्केरी) येथील हजरत सईद गुलाबशा वाली दर्गा कमिटीने नुकतेच सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. हजरत सईद गुलाबशा वाली दर्गा हा अतिशय जुन्या काळातील दर्गा असून बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार तो वक्फ नोंदणीकृत आहे. सदर दर्गा हा हिंदू -मुस्लिम बांधवांच्या एकात्मतेचे प्रतिक असलेले धार्मिक स्थळ आहे या ठिकाणच्या उरुसा निमित्त हजारो हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत असतात.
हा दर्गा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या मध्ये येत असल्याची समस्या यापूर्वीही उद्भवला होती. मात्र तत्कालीन बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 2 फेब्रुवारी 2003 रोजी झालेल्या बैठकीत 13 संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही समस्या निकालात काढण्यात आली.
तसेच जातीय सलोखा राखण्यासाठी सदर दर्गा आहे त्या जागीच राहू द्यावा आणि दर्गा देखभालीसाठी नियुक्त दोघांसाठी तेथे खोली बांधून देण्याचा निर्णय घेतला त्याला त्यानुसार खोली बांधून देण्यात आली. त्यानंतर सर्व कांही सुरळीत असताना आणि पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा दर्गा अन्यत्र हटविला जाऊ नये असे ठरलेले असताना आता पुन्हा एनएच -4 च्या विद्यागिरी धारवाड येथील प्रकल्प विकास अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे विकास काम हाती घेण्यात आले असल्याने दर्गा अन्यत्र हटवण्याची धमकी दिली आहे.
तरी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन हजरत सईद गुलाबशा वाली दर्गा अन्यत्र न हटवता एकतर राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग बदलावा अथवा दर्ग्याच्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज बांधावा ही विनंती, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.