कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येतं नववर्ष साजरा करणाऱ्या राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी कर्नाटक सरकारने कोरोना मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यानुसार चित्रपटगृह आणि शाळा कॉलेजेसह सर्व बंदिस्त जागांच्या ठिकाणी फेस मास्कची सक्ती असणार आहे. याखेरीज नववर्षाचा उत्सव मध्यरात्री 1 वाजण्यापूर्वी समाप्त करावयाचा आहे.
गर्भवती महिला, लहान मुले, वयस्क नागरिक आणि आजारी अथवा आरोग्य ठीक नसलेल्यांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग टाळावा, असा सल्लाही शासनाने दिला आहे.
बंदिस्त जागेतील मनोरंजनाचे कार्यक्रम अथवा खेळांच्या ठिकाणी उपलब्ध आसन व्यवस्थेपेक्षा जास्त लोकांना आत प्रवेश दिला जाऊ नये. याव्यतिरिक्त शाळांमध्ये सॅनिटायझर, फेस मास्क आणि संपूर्ण लसीकरण अनिवार्य असणार आहे. चीनसह जगातील कांही भागांमध्ये नुकताच कोरोनाचा उद्रेक झाला असल्यामुळे कर्नाटक सरकारने हे खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत.
गेल्या आठवड्यात सरकारने ताप सर्दी, खोकला, यासारखे आजार (आयएलआय) श्वसनाचा आजार (सारी) असलेल्यांसाठी राज्यात कोरोना चांचणी अनिवार्य करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. आता एअर कंडिशन रूम आणि इतर बंदिस्त जागांमध्ये फेस मास्कची सक्ती करण्यात आली आहे.
येत्या नववर्षाच्या स्वागत सोहळ्या दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेल्या कर्नाटक सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचीचे तंतोतंत पालन करून नागरिकांनी सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण राहून नववर्ष स्वागताचा आनंद लुटावा असे आवाहन केले आहे.