बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी तसेच पक्ष संघटन आणि इतर मुद्दे विचारात घेऊन येत्या ११ जानेवारीपासून बेळगावमधून काँग्रेस नेत्यांनी बस यात्रेचे आयोजन केले आहे.
बेळगावमधून सुरु झालेली बसयात्रा राज्यभरात संचार करणार आहे, अशी माहिती केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली.
सोमवारी बेळगावमधील काँग्रेस भवन येथे सुवर्णसौध येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलाविण्यात आलेल्या प्राथमिक बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.
कृष्णा-म्हादई संदर्भात राज्यशासनाला अपयश आले असून कृष्णा, म्हादई सिंचन योजनेसंदर्भात ३० डिसेंबर रोजी विजापूर आणि २ जानेवारी रोजी हुबळी-धारवाड तसेच ८ जानेवारी रोजी चित्रदुर्ग येथे काँग्रेसचे अधिवेशन होणार असल्याचे डीकेशी म्हणाले.
महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते, असा इतिहास आहे. यामुळे बेळगावमधूनच बस यात्रेचा प्रारंभ होणार असून राज्यात पुन्हा लोकाभिमुख काँग्रेस सरकार आणण्यासाठी पक्ष आणि कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचे डीकेशींनी सांगितले.