विधिमंडळ अधिवेशनाच्या नावाखाली पक्षाचे कार्यक्रम दामटण्यात भाजप नेते व्यस्त आहेत. भाजपला दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशी टीका काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी केली.
बेळगाव सुवर्णसौध येथे खर्गे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सिद्धरामय्या आणि आमच्यात कसलेही मतभेद नसून ती माध्यमातली अफवा आहे. भाजप नेत्यांनी त्याला खत पाणी दिले आहे. मतभेद विरोधी पक्षात नाहीत तर ते भाजपमध्ये आहेत.
येडीयुराप्पा विरुद्ध भाजप, यत्नाळ विरुद्ध निराणी, प्रतापसिंह विरुद्ध अश्वथ नारायण यांच्यात सुरू असलेल्या वादावर त्यांनी का बोलू नये? भाजपमध्ये भरपूर मतभेद आहेत, परंतु ते आमच्यात दोष शोधण्याचा प्रयत्न करतात असा आरोप प्रियांक खर्गे यांनी केला.
अधिवेशनात काँग्रेसचा आवाज कमी झाला का? या प्रश्नावर आम्ही लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. तथापि मुख्य विषय पत्रिका सोडून पुरवणी विषय पत्रिका आणून सत्ताधारी भाजप अडवणूक करत आहे. परवा सिद्धरामय्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करणार होते. त्या दिवशीही तोच अनुभव आला. सुपारी उत्पादकांचे प्रश्न, शेतकऱ्यांची खताची समस्या यावर ते बोलणार होते. नीलम संस्थेचा घोटाळा, सरकारचा 40 टक्के कमिशनचा घोटाळा, कल्याण कर्नाटक आणि उत्तर कर्नाटकचे प्रश्न अशा अनेक विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे होती.
मात्र सत्ताधारी सदस्य गोंधळ घालतात किंवा सरकार पुरवणी विषय पत्रिका आणते. त्यामुळे सकारात्मक चर्चा होत नाही. अधिवेशनाखाली पक्षाचा कार्यक्रम राबविण्यात भाजप नेते व्यस्त आहेत असे सांगून एकंदर सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा स्पष्ट आरोप प्रियांक खर्गे यांनी केला.