बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या धार्मिक वातावरणात ख्रिसमस सण उत्साहात साजरा केला.
गेल्या तीन वर्षातील कोरोना प्रादुर्भावाच्या निर्बंधामुळे सर्वच सणवार साध्या पद्धतीने घरापुरते मर्यादित साजरे करण्यात आले होते. मात्र यंदा तशी परिस्थिती नसल्यामुळे सर्व ख्रिश्चन बांधवांनी शनिवारी मध्यरात्रीपासून मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यास सुरुवात केली.
ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ख्रिसमसच्या निमित्ताने शहरातील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठीक ठिकाणी येशू जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहेत. ख्रिस्ती धर्मगुरूंनी चर्चमध्ये विशेष प्रार्थना करून प्रभू येशू बद्दल माहिती दिली. तसेच येशू ने दिलेल्या संदेशाचे जीवनात पालन करण्याचे आवाहन केले.
बेळगाव ख्रिश्चन धर्म प्रांताचे मुख्यालय असलेल्या कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त विशेष प्रार्थना करण्यात आली. धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी उपस्थित त्यांना संबोधित करून सर्वांना ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील सेंट ऍंथोनी चर्च, मेथॉरिस्ट चर्च तसेच अन्य इतर चर्चेमध्ये ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या संख्येने जमून प्रभू येशूची प्रार्थना केली.
त्याचप्रमाणे कॅरोल्स गायन केले. मेथोडेस्ट चर्चच्या धर्मगुरूंनी देखील बेळगावच्या जनतेला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या एकंदर कोरोनामुळे दोन वर्ष मोठ्या प्रमाणात साजरा होऊ न शकलेला ख्रिसमस सण यंदा मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात येत आहे.