बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत उभारण्यात आलेल्या स्मार्ट बस स्थानकातील गाळ्यांसाठी तीन वेळा निविदा काढूनही एकही खरेदीदार न मिळाल्यामुळे आता चौथ्यांदा ऑनलाइन निविदा मागविण्याची वेळ बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डावर आली आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकासमोर असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील स्मार्ट बस स्थानकाचे उद्घाटन होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. या बस स्थानकात एकूण 12 दुकान गाळे आहेत.
यापैकी सहा दुकान गाळ्यांसाठी गेल्या 6 महिन्यात तीन वेळा निविदा मागवण्यात आल्या आहेत. मात्र एकही खरेदीदार न मिळाल्यामुळे आता पुन्हा चौथ्यांदा निविदा मागविण्यात आल्या आहेत. येथील एक गाळा 76 चौ. फूट इतका आहे.
स्मार्ट बस स्थानकातील सदर 1 ते 6 क्रमांकाच्या गाळ्यांसाठी गेल्या पाच डिसेंबर पासून ऑनलाईन निविदा खुली करण्यात आली असून 23 डिसेंबर पर्यंत ही निविदा भरता येणार आहे. दोन वर्षाच्या करारावर हे गाळे दिले जाणार असून त्यानंतर संबंधितांना आपला गाळा बोर्डाकडे हस्तांतरित करावा लागणार आहे हस्तांतर करण्यास उशीर झाल्यास दंड आकारला जाणार आहे या निविदेसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये इएमडी रक्कम 40,120 रुपये आहे. यासाठी 20,000 रुपयापुढे यावर बोली लागणार आहे. वर्षाच्या भाड्याची रक्कम एकदाच भरावी लागणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान पहिल्या सहा गाळ्यात व्यापार होण्याची शक्यता कमी वाटत असल्याने त्या ठिकाणी खरेदीदार मिळत नसल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. तसेच 6 ते 12 क्रमांकाच्या गाळ्यांसाठी निविदा खुली झाल्यास अनेक ग्राहक हे गाळे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.