बेळगाव लाईव्ह : बेळगाव सुवर्णसौध येथे १९ डिसेंबर पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात आले होते. अधिवेशन म्हटलं कि मंत्रीमहोदयांची रेलचेल आलीच. आणि मंत्रीमहोदयांच्या पाहुणचारासाठी जिल्हा प्रशासनाची जबाबदारीही ओघाओघाने वाढलीच. मात्र या साऱ्या गोंधळात अधिवेशनापूर्वीपासूनच बेळगावकरांना वेठीला धरण्यात आले. रस्त्यांची डागडुजी, हॉटेल व्यावसायिकांसाठी नियम, रहदारीचे नियम यासह अनेक कारणांमुळे बेळगावकरांचा श्वास गुदमरला. हे अधिवेशन अनियमित काळासाठी आज तहकूब करण्यात आले आणि मंत्रिमहोदयांनी पुन्हा परतीची वाट धरली.
सभापती विश्वेश्वर कागेरी हेगडे यांनी अनियमित काळासाठी सभागृह तहकूब केले असून आज सायंकाळपासूनच मंत्रिमहोदयांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. बेळगावमधील अधिवेशन नेहमीच वादाचे कारण राहिले आहे. जनतेच्या पैशांचा चुराडा करून बांधण्यात आलेल्या सुवर्णसौधमध्ये केवळ बेळगाव वर कर्नाटकाचा हक्क सांगण्यासाठी अधिवेशन भरविले जाते. वर्षातून भल्या मोठ्या वस्तूचा उपयोग केवळ एकदाच आणि काही दिवसांपुरताच केला जातो. देखभाल आणि दुरुस्तीसाठीदेखील कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र या अधिवेशनात आजवर कधीच महत्वपूर्ण असे निर्णय झाले नाहीत. याठिकाणी काही सरकारी कार्यालये हलविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र हा प्रस्तावदेखील अधिवेशनाप्रमाणेच बारगळला आहे.
अधिवेशनासाठी येणारे मंत्री महोदय केवळ पिकनिक साठी आल्याप्रमाणे बेळगावमध्ये दाखल होतात. मंत्रीमहोदयांची व्यवस्था करण्यासाठी व्यस्त असलेले प्रशासन आणि केवळ सहलीप्रमाणे बेळगावमध्ये दाखल झालेल्या मंत्रीमहोदयांमुळे बेळगाव शहर-परिसर आणि सर्व बेळगावकर वेठीला धरले जातात. वाहतूक कोंडी, वाहतुकीतील बदल, फेरीवाल्यांना लावण्यात येणारे रोख अशा या ना त्या कारणामुळे बेळगावकरांना नाहक त्रास सोसावा लागतो. एरव्ही आपला जीव मुठीत धरून खड्डेमय रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाकडून अधिवेशनाच्या निमित्ताने रस्त्याची डागडुजी करण्यात येते. अर्थात हि डागडुजी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच उखडून जाते! मात्र मंत्रिमहोदयांनी आलिशान वाहनातून जाताना कोणत्याही खड्ड्यामुळे धक्का लागू नये याची खबरदारी मात्र प्रशासन आवर्जून घेते.
अधिवेशनाच्या निमित्ताने येणाऱ्या मंत्रीमहोदयांमुळे अनेकांना आपले वैयक्तिक कार्यक्रम ऐन घटकेला रद्द करावे लागतात. सर्वसामान्यांची तारांबळ उडते. बुकिंग केलेल्या हॉटेल्सच्या खोल्या तडकाफडकी रिकाम्या कराव्या लागतात. इतकेच नाही तर काहींना विवाहाचे मुहूर्तदेखील केवळ अधिवेशनासाठी आलेल्या मंत्रीमहोदयांमुळे पुढे ढकलावे लागतात. इथून पुढे गोव्याला रवाना होऊन ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ करून परतणाऱ्या मंत्रीमहोदयांसाठी बेळगावमधूनच गोवा बुकिंग करण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. शिवाय अधिवेशनासाठी सर्वसामान्य जनतेच्या पैशांचाच चुराडा होतो. अधिवेशनातून सर्वसामान्यांसाठी विशेष असे निष्पन्न काहीच होत नाही. सत्ताधारी-विरोधकांमध्ये रांगणारे वाद, गोंधळ आणि अचानक वाजणारे अधिवेशनाचे सूप! सर्वसामान्यांना नेहमीच या अधिवेशनामुळे त्रास सहन करावा लागतो. अधिवेशनामुळे बेळगावकरांचा श्वास गुदमरतो. यंदाचे अधिवेशन १ दिवस आधीच गुंडाळल्याने बेळगावकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. उद्यापासून पुन्हा बेळगावची घडी पूर्ववत होईल आणि पुन्हा बेळगावकर आपल्या दैनंदिन घडामोडीत व्यस्त होतील. आणि पुन्हा बेळगावचा ‘पांढरा हत्ती’ पुढील अधिवेशनापर्यंत सर्वसामान्यांच्या पैशावर जशास तसा उभा राहील!