Monday, May 6, 2024

/

बहुतांश आमदारांनी फिरविली अधिवेशनाकडे पाठ

 belgaum

बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आयोजित केल्या जाणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे यंदा राज्यातील बहुतांश आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. राज्यात भाजप, काँग्रेस व निधर्मी जनता दलाची मिळून एकूण 210 आमदार असून बेळगाव येथील सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात म्हणजे पहिल्या पाच दिवसात यापैकी 100 पेक्षा कमी आमदारांनी हजेरी लावली आहे. या अधिवेशनावर दररोज 3.9 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

बेळगाव कर्नाटकचे आहे हे दर्शविण्याच्या अट्टहासापोटी कर्नाटक सरकारकडून बेळगावात हिवाळी अधिवेशन भरविले जाते. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सध्या कर्नाटक विधिमंडळाची हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र या अधिवेशनासाठी सभागृहातील सदस्यांची उपस्थिती निराशाजनक असल्यामुळे हा एक चर्चेचा विषय झाला आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि निधर्मी जनता दल या पक्षांचे एकूण 210 आमदार आहेत. खरंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी या सर्व आमदारांनी हजेरी लावणे अपेक्षित होते. तथापि बेळगावमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनाला पहिल्या दिवसापासूनच 100 पेक्षा कमी आमदार हजेरी लावत असून उर्वरितांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तथापि आमदार कमी असले तरी खर्चाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता अधिवेशनावर दररोज तब्बल 3.9 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

बेळगाव सुवर्ण विधानसौध मधील हिवाळी अधिवेशनाला गेल्या सोमवारी 19 डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. तेंव्हापासून 100 पेक्षा कमी आमदारांनी विधानसभा सभागृहात हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे आज सोमवार दि. 26 डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवशी सभागृहात केवळ 93 आमदारांनी हजेरी लावली आहे.

 belgaum

हिवाळी अधिवेशनासाठी गेल्या 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत दररोज सभागृहात उपस्थित आमदारांच्या संख्येचा तपशील (अनुक्रमे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार यानुसार) पुढील प्रमाणे आहे. भाजप (आमदार 119) – 48, 41, 51, 36, 38. काँग्रेस (आमदार 69) – 37, 31, 39, 29, 22. निधर्मी जनता दल (आमदार 32) – 8, 7, 5, 9, 6. या पद्धतीने अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात पहिल्या दिवशी एकूण 93, दुसऱ्या दिवशी 79, तिसऱ्या दिवशी 95, चौथ्या दिवशी 74 आणि पाचव्या दिवशी म्हणजे गेल्या शुक्रवारी तर एकूण फक्त 66 आमदारांनी विधानसभेच्या सभागृहात हजेरी लावली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.