बेळगाव सुवर्ण विधानसभेतील हिवाळी अधिवेशनादरम्यान उत्तर कर्नाटकातील ज्वलंत समस्यांबाबत आवाज उठवण्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेली हयगय, दाखवलेली अनास्था बुधवारी स्पष्टपणे उघड दिसून आल्यामुळे हे अधिवेशन म्हणजे उत्तर कर्नाटकसाठी एक प्रकारे थट्टेचा विषय झाले आहे.
विधानसभेतील 224 आमदारांपैकी फक्त 30 आमदारांनी उत्तर कर्नाटकातील समस्या संबंधी चर्चेत भाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने आमदार ए. एस. पाटील -नडहळ्ळी यांनी उत्तर कर्नाटकातील समस्या सभागृहात मांडल्या. राज्यात 224 आमदार असताना सदर 9 दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी सभागृहात 100 पेक्षा कमी आमदारांनी हजेरी लावली होती.
अधिवेशनाचे कामकाज 41 तास आणि 20 मिनिटे चालले असले तरी यापैकी फक्त 2 तास उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी देण्यात आले होते.
अधिवेशनादरम्यान सभागृहाने राज्यातील विविध विधेयकं, प्रश्न आणि समस्या यावर 41 तास चर्चा केली आणि शेवटी सहा विधेयकं संमत करण्यात आली. गेल्या 2021 मधील हिवाळी अधिवेशनामध्ये दहा दिवसांच्या कालावधीत एकूण 52 तास 14 मिनिटे सभागृहाचे कामकाज चालले आणि 14 विधेयक संमत करण्यात आली होती. उत्तर कर्नाटकातील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा या अधिवेशन काळात प्रकर्षाने जाणवला.
या लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील समस्यांवर आवाज उठवून सभागृहाचे लक्ष वेधले नाही. परिणामी या अधिवेशनात उत्तर कर्नाटक फक्त एक थट्टेचा विषय झाला होता असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.