कर्नाटक सरकार येत्या 19 डिसेंबरपासून दहा दिवसांसाठी बेळगावच्या सुवर्ण विधानसौध इमारतीत स्थलांतरित होत आहे. सुवर्ण विधानसौधमध्ये येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून त्यासाठी जोरदार तयारी करण्याद्वारे बेळगाव सज्ज केले जात आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील मंत्री, अधिकारी, विविध पक्षांचे नेते, अतिमहनीय व्यक्ती 10 दिवस बेळगाव शहरात वास्तव्यास असणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते सुधारण्याचे काम सुरू असतानाच सुवर्ण विधानसौधला नवे रूप देऊन तिचा कायापालट करण्याचे कामही जोमाने सुरू आहे.
उत्तर कर्नाटकातील सत्ता केंद्र असलेल्या सुवर्ण विधानसौधची स्वच्छता करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मान्यवरांच्या विविध कार्यक्रमांसाठी इमारतीच्या प्रांगणात मंडप घालण्यात येत आहेत. इमारतीच्या अंगणातील केरकचरा साफ करून ते हिरवेगार करण्यासाठी शोभेच्या झाडांची रोपे लावण्याचे कामही करण्यात आले आहे.
अधिवेशन काळात विविध मागण्यांसाठी विभिन्न संघटना 10 दिवस निदर्शने, धरणे, मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनं करणार असून त्यांच्यासाठी बस्तवाड जवळील जागा निश्चित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी तंबू उभारण्यात येत आहेत. आंदोलकांनी सुवर्णसौद्धच्या प्रांगणात प्रवेश करू नये यासाठी पद्धतशीरपणे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
एकंदर अधिवेशनासाठी येणारी महनीय, अतिमहनीय मंडळी, अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने भोजन, निवास, वाहतूक आदी सर्व प्रकारची तयारी -व्यवस्था केली आहे. अधिवेशन काळात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी सर्व ती पूर्व खबरदारी घेतली जात आहे.