बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला असून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नसल्याचा ठराव कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनात संमत केला.
दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेल्या ‘चलो कोल्हापूर’च्या नाऱ्यानंतर आज समस्त सीमावासीय कोल्हापूरला धडकले.
या पार्श्वभूमीवर आज समिती नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या मोर्चात खासदार संजय मंडलिक देखील आपल्या कार्यकर्त्यांसमवेत दाखल झाले.
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय मंडलिक म्हणाले, आज सीमावासीयांनी आयोजिलेल्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी उभा आहे. जेव्हा केव्हा अशी आंदोलने होतात तेव्हा सर्वात आधी कोल्हापूर सीमावासीयांना पाठिंबा देत आले आहे. आजच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनादेखील आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
जोवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय जाहीर होत नाही तोवर हा भाग केंद्रशासित ठेवावा अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केली.