सीमाप्रश्नावरून हिरेबागेवाडी टोल नाक्यावर उच्छाद मांडून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण केलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्रात कन्नडीगांना धोका असल्याचा कांगावा करत त्यांना सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. त्यामुळे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे.
बेळगावात पोलिसांनी प्रवेश बंदी करूनही दोन दिवसापूर्वी बेळगावच्या हिरेबागेवाडी टोल नाक्यावर आपल्या समर्थकांसह धिंगाणा घातलेल्या टी. आर. नारायणगौडा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावे अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना तेथील राजकीय पक्ष आणि लोकांपासून धोका निर्माण झाल्याचा कांगावा करवेने केला आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर कर्नाटकचा मोठा भाग महाराष्ट्रात गेला तरी देशाच्या एकतेसाठी कर्नाटक ते सहन करत राहिला.
मात्र आता सीमाप्रश्न पुन्हा पेटल्यामुळे महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांवर त्यांच्या मालमत्तेवर हल्ले केले जात आहेत. त्याला शिवसेनेचे दोन्ही गट मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्वच पक्षांचा पाठिंबा असल्याचा बिनबुडाचा आरोप करून तेथील कन्नड डिकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
करवे राज्य संचालक महादेव तळवार यांनी अप्पर जिल्हाधिकारी अशोक धुडगुंटी यांना निवेदनातील मागण्या वाचून दाखवल्या. यावेळी सुरेश गड्डनावर, गणेश रोकडे, बाबू जडगी, कलमेश कोडकणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.