कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभांपैकी एक असलेल्या बेळगावच्या किल्ला तलाव येथील ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वज पुन्हा डौलाने फडकू लागला आहे.
देशातील सर्वात उंच ध्वज स्तंभांपैकी एक ध्वजस्तंभ राष्ट्रभक्ती आणि आदर दर्शविण्यासाठी बेळगावच्या किल्ला तलावानजीक उभारण्यात आला आहे. मात्र प्रारंभापासूनच या ध्वजस्तंभावर देशाचा तिरंगा ध्वज अल्पकाळच फडकला आहे.
परिणामी शहराची शान ठरू शकणारा हा ध्वजस्तंभ असून नसल्यासारखा झाला होता. तथापी तांत्रिक बिघाडा, पाऊस वाऱ्यासारखी नैसर्गिक आपत्ती यामुळे या स्तंभावरील राष्ट्रध्वज खराब होत असल्यामुळे या स्तंभावर फक्त 26 जानेवारी, 15 ऑगस्ट तसेच अन्य विशेष निमित्ताने तिरंगा फडकविण्याचा निर्णय अलीकडे घेण्यात आला आहे.
त्यानुसार आता कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने किल्ला तलावा नजीकच्या रिकाम्या ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वज पुन्हा डौलाने फडकू लागला आहे.