देशाची राजधानी दिल्लीसाठी बेळगावहून असणारी स्पाइस जेट एअरलाइन्सची एकमेव विमान सेवा येत्या 10 डिसेंबरपासून बंद केली जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विमानांची कमतरता असल्यामुळे की त्या फेब्रुवारी 2023 पर्यंत बेळगावसह अन्य कांही मार्गावरील स्पाइस जेट विमानसेवा स्थगित करण्यात येणार आहे.
स्पाइस जेट एअरलाइन्सची सकाळच्या वेळी असलेली बेळगाव -दिल्ली विमानसेवा अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. प्रारंभ एप्रिल महिन्यातच 46 हजार 850 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला होता. या विमानसेवेमुळे 2.20 तासात दिल्लीला पोहोचून त्यानंतर इच्छित स्थळी पोहोचण्याद्वारे एका दिवसात आपले काम पूर्ण करणे संबंधितांना शक्य होत होते.
मात्र बेळगावहून नवी दिल्लीसाठी असणारी ही एकमेव विमान सेवा 10 डिसेंबरपासून बंद होणार असल्यामुळे आता त्याचा फटका उद्योजक, व्यापारी, लष्करी व्यक्ती आणि इतरांना बसणार आहे. बेळगाव -दिल्ली विमानसेवा असण्याबरोबरच बेळगाव विमानतळावर आगमन आणि उड्डाण करणारे स्पाइस जेटचे एकमेव मोठे बोईंग विमान होते.
या विमानतळावरून आगमन व उड्डाण करणाऱ्या इतर विमान कंपन्यांची विमाने ही लहान आहेत. इंडिगो एटीआर -72 -600 यासारखे लहान प्रवासी विमान वापरते तर स्टार एअर एम्बरार विमानाचा वापर करते.
बेळगाव ते दिल्ली विमान सेवा सुरू झाल्यानंतर फक्त बेळगावच नाहीतर सावंतवाडी, चंदगड, गडहिंग्लज, कोल्हापूर आदी भागातील प्रवाशांची चांगली सोय झाली होती. बेळगावातील अनेक उद्योजक या विमानसेवेचा लाभ घेत होते.
बेळगावतून यापूर्वी हैदराबाद व मुंबई विमान सेवा सुरू होती, मात्र ती विमान सेवा यापूर्वीच बंद केली आहे. आता बेळगाव दिल्ली विमानसेवा 10 डिसेंबर पासून बंद होणार आहे. यामुळे बेळगाव आणि परिसरातील विमान प्रवाशांना आता गोवा, हुबळी किंवा अन्य ठिकाणाहून दिल्ली गाठावी लागणार आहे.