कर्नाटक सरकारने बंदी घातल्यानंतर चंदगड व गडहिंग्लजच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची आज शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धनंजय पाटील, किरण हुद्दार आदी युवकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन बेळगाव संबंधी विभिन्न विषयावर चर्चा केली.
गडहिंग्लज येथील महाराष्ट्र -कर्नाटक सीमाभाग समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांच्या भेटी प्रसंगी खानापूर तालुका म. ए. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मागील 6 डिसेंबर रोजीच्या आपल्या बेळगाव दौऱ्यात खानापूरचा समावेश नव्हता. मात्र आगामी दौऱ्यात आपण खानापूरला भेट द्यावी असे निमंत्रण मंत्री देसाई यांना दिले. तसेच महाजन अहवाल तयार करताना कशाप्रकारे खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध गावे कशाप्रकारे महाराष्ट्राला डावलून अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली याची माहिती दिली. यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सीमा भागातील मराठी भाषिक 850 गावांना शैक्षणिक तसेच अन्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाणार आहे. तेथील जनहितार्थ मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारख्या योजना त्या गावांमध्ये राबविण्याचा आमचा विचार आहे. सीमाभागातील 50 हून अधिक संस्थांना महाराष्ट्र शासन मदत करणार आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर कर्नाटकची भूमिका थोडी बदलली असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सीमा भागात येण्यास आम्ही मज्जाव करणार नाही असे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे एकदा का बेळगावातील कर्नाटक सरकारचे अधिवेशन उरकले की मी आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील आम्ही दोघे बेळगाव सीमाभागाच्या दौऱ्यावर येणार आहोत. येत्या रविवारी आम्ही उभयता मुख्यमंत्री शिंदे यांची त्या संदर्भात भेट घेणार आहोत. आम्ही कोणत्या कार्यासाठी सीमाभागात येत आहोत याची कर्नाटकला पूर्वकल्पना देऊन अधिकृतरित्या आम्ही आमचा आगामी दौरा करणार आहोत असे सांगून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्र सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे हे कायम लक्षात ठेवावे असे समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी स्पष्ट केले.
ढोलगरवाडी येथे ‘यांनी’ घेतली मंत्री देसाई यांची भेट
मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्या नेतृत्वाखालील समिती कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज ढोलगरवाडी येथे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे यांची भेट घेतली.
सदर भेटीप्रसंगी विकास कलघटगी यांनी कर्नाटक प्रशासनाकडून आगामी कर्नाटकी अधिवेशनाच्या विरोधात आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कशा पद्धतीने आडकाठी केली जाते याची सविस्तर माहिती दिली. तसेच समन्वयक मंत्र्यांना स्थानिक वर्तमानपत्र दाखवत कर्नाटक शासनाकडून होणारी दंडलीची माहिती अवगत करून दिली. त्यावर बोलताना रविवारी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून याविषयी कल्पना देणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपण नक्कीच बेळगावचा अधिकृत दौरा करू असे ठोस आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.