बेळगाव लाईव्ह विशेष : गेल्या आठवड्याभरापासून सीमाप्रश्नावरून संपूर्ण सीमावर्ती भाग ढवळून निघाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वक्तव्यं, सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांची संकल्पित बेळगाव भेट, या सर्व पार्श्वभूमीवर नेमकं चाललंय तरी काय याचा अंदाज सर्वसामान्य माणसाला येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटनांचे कारणामागचे राजकीय घमासानाचे कारण काय? याबाबत एकंदर सामान्य नागरिक संभ्रमात आहे. या घटनांनी सीमावर्ती भागात
मोठ्या प्रमाणात उलथा पालथ होत चालली आहे. इतक्या वर्षातून सीमासमन्वयक मंत्री बेळगावला येणार यामुळे सीमाभागात उत्साहातच वातावरण निर्माण झालं आहे. सीमासमन्वयक मंत्र्यांचा बेळगाव दौरा यामुळे बेळगावमधील सीमावासीयांमध्ये पसरलेले चैतन्याचे वातावरण आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील जत मध्ये कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतलेला पुढाकार यावरून राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार जनता करत आहे.
एकीकडे चंद्रकांत दादा पाटील यांच्या बेळगावदौऱ्याची चर्चा जोरदार रंगत असून दुसरीकडे सांगली मधील जत तालुक्यातील काही जुने दाखले देत तेथील जनतेला कर्नाटकात समाविष्ट होण्याची इच्छा असल्याचे सांगत आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलाविली. जतचे आमदार विक्रम सावंत यांना बोलावून घेऊन तेथील भागासाठी तब्बल २ हजार कोटींचा निधी मंजूर केला. यामुळे जत तालुक्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. गेल्या कित्येक काळापासून दुष्काळाने होरपळणाऱ्या जतमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होती. १० किलोमीटर अंतर पार करून पाण्याची सोय करावी लागणाऱ्या नागरिकांकडे राज्यकर्त्यांचे मोठे दुर्लक्ष झाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या एका वाक्यावरून महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले. खडतर जीवन जगणाऱ्या जतवासीयांना महाराष्ट्र सरकारने दिलासा दिला. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारने जत पूर्व भागात तुम्बच्या योजनेचे पाणी सोडल्याने एकाच दिवसात तेथील तिकोंडा तलाव ओव्हरफ्लो झाला.
कर्नाटकातील सीमावर्ती भागातील खेड्यांना चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्येक वर्षाला एक लाख रुपयांची मंजुरी दिली. बेळगाव दौऱ्यादरम्यान सीमावासियांच्या, येथील पत्रकार, नागरिक, शेतकरी, साहित्यिक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्यांशी भिडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सीमासमन्वयक मंत्र्यांच्या आगमनामुळे सीमाभागात वेगळे वातावरण निर्माण झाले असून एकंदर परिस्थितीमुळे राजकारण संवेदनशील झाल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्र – कर्नाटकातील मराठी-कन्नड भाषिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी दोन्ही राज्य सरकार पुढे सरसावली आहेत खरी मात्र परस्पर विरोधी मतप्रदर्शनदेखील होत असलेले पाहायला मिळत आहे. दुसऱ्या राज्यात येण्यापासून एकमेकाला रोखण्याचे इशारे देण्यात येत आहेत. मात्र दोन्ही राज्यांसह केंद्रात देखील भाजपचाच सरकार असून अशा पद्धतीचे वातावरण आताच कसे तयार झाले याबाबत जनतेमध्ये मात्र कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या साऱ्या घटना पाहता राजकारणाला दररोज नवनवे आयाम मिळत असून यामाध्यमातुन राजकीय साठमारी मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही जाणवत आहे. अचानकपणे वेगवान नागरी समस्या सुटताना दिसत आहेत.
दुष्काळाने होरपळणाऱ्या जत तालुक्याचा विषय असो किंवा वर्षानुवर्षे कर्नाटकाचा अत्याचार सहन करणारा कर्नाटकातील सीमाभाग असो, या भागात राजकीय संवेदनशीलता दिसून येत असून आता जनतेला मात्र राजकारण कसे संवेदनशील होऊ शकते याचे शस्त्र आणि शास्त्र दोन्ही अवगत झाले आहे. शिवाय राजकारण्यांचे लक्ष वेधून आपल्या समस्यांवर निश्चित आणि कायमस्वरूपी तोडगा कसा काढायचा हेदेखील आता जनतेला कळू लागले आहे.