बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पसरत असलेल्या जनावरांच्या त्वचेच्या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या सचिव सलमा के. फहीम यांनी बेळगाव व खानापूर तालुक्यात धडक मोहीम राबवून औषधे व लसीचा साठा तपासला. त्वचा रोगाने बाधित जनावरांची पाहणी केल्यानंतर त्यांनी बेळगाव तालुक्याच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयाला अचानक भेट देऊन स्टॉक रूममधील आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांची पाहणी केली.
बेळगाव जिल्ह्य़ातील सर्वाधिक जनावरांचे मृत्यू झाले असून मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जनावरांना त्वचेच्या गाठींच्या आजारावर मोफत उपचाराची तरतूद तपासून प्रत्येक गावातील सर्व जनावरांचे तातडीने लसीकरण करावे. लसीकरण व उपचाराचा वेग वाढवावा, अशा सूचना त्यांनी जिल्हा उपसंचालक डॉ.राजू कुलेर यांना दिल्या.
यावेळी मृत गुरांचे सर्वेक्षण, शवविच्छेदन आणि मृत गुरांच्या मालकांना शासनाकडून वाटप करण्यात येणारी नुकसान भरपाई या कामांचा आढावा घेण्याचे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीने प्रतिसाद देण्याचे आदेश सलमा फहीम यांनी दिले.
ज्या भागात त्वचा रोग आढळून आला आहे, तेथे जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. त्वचारोगावरील उपचार व जनजागृती कार्यक्रम ग्रामीण भागात अधिकाधिक राबवावेत,असा निर्वाणीचा आदेश विभागाचे संचालक डॉ.मंजुनाथ पालेगर यांनी दिला.
यावेळी बेळगाव पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ.राजू कुलेर, डॉ.मंजुनाथ पालेगर आदींसह पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.