काळी नदी, दांडेली येथे गेल्या 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत आयोजित प्रतिष्ठेच्या सदर्न कमांड एडव्हेंचर चॅलेंज कप स्पर्धात्मक मोहीम वजा निवड चांचणी -2022 चा पुरस्कार वितरण समारंभ आज सोमवारी पार उत्साहात पडला.
काळी नदी, दांडेली येथे आयोजित सदर्न कमांड एडव्हेंचर चॅलेंज कप स्पर्धात्मक मोहीम वजा निवड चांचणीमध्ये सैन्य दल सदर्न कमांडच्या नऊ संघांनी भाग घेतला होता
. या स्पर्धात्मक मोहिमेत 60 मीटर नैसर्गिक रॉक क्लाइंबिंग करणे, 12 कि. मी. टेकडीवर धावणे आणि काळी नदीमध्ये 12 कि. मी. वॉटर राफ्टींग करणे या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धात्मक मोहिमेचा पुरस्कार वितरण समारंभ आज सोमवारी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या शरकत ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सदर्न कमांड आर्मी कमांडर यांच्यावतीने मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडर जयदीप मुखर्जी यांनी एडव्हेंचर चॅलेंज कप -2022 पटकाविल्याबद्दल दक्षिण भारत विभाग संघाचे प्रमुख मेजर लमतीनलाल यांना विजेतेपदाचा पुरस्कार देऊन गौरविले. त्याचप्रमाणे ट्रायथलॉन मधील ओव्हर ऑल बेस्ट ॲथलीटसाठी असलेला करंडक शिपाई शेखर बाळू काळे याला प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरणापूर्वी ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून समयोचित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. आता सदर्न कमांड मधून निवडण्यात आलेले दोन संघ ईंगकिओंग, अरुणाचल प्रदेश येथील सियांग नदीच्या ठिकाणी येत्या 13 ते 19 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणाऱ्या आर्मी एडव्हेंचर कप या स्पर्धात्मक मोहिमेत भाग घेणार आहेत.