भाडोत्री इमारतीत असलेल्या अंगणवाडी केंद्रांचे नजीकच्या सरकारी शाळा इमारतींमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याने घेतला आहे. त्यानुसार आता सरकारी शाळांना अंगणवाडीसाठी एक खोली उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात 5,332 अंगणवाडी केंद्रे आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक अंगणवाडी केंद्रे भाडोत्री इमारतींसह गावातील मंदिर, समुदाय भवन व इतर ठिकाणी भरविले जात आहेत.
त्यामुळे महिला व बालकल्याण खात्याला भाडोत्री इमारतीत असलेल्या केंद्रांसाठी दरमहा मोठ्या प्रमाणात भाडे द्यावे लागत आहे. यासाठीच जी अंगणवाडी केंद्रे भाडोत्री इमारतीत सुरू आहे. ती केंद्रे गावातील सरकारी शाळेच्या इमारतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या सर्वच भागातील अंगणवाडी केंद्रांचे शाळांमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बऱ्याच शाळांमधील खोल्या रिकामी असल्याने त्या शाळांमध्ये अंगणवाडी केंद्र स्थलांतरित करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे मत महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, अंगणवाडी केंद्रांचे सरकारी शाळांमध्ये स्थलांतर झाल्यास मुलांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांचे ही मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांचे शाळेमध्ये स्थलांतर करण्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.