बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात असून यावेळी महाराष्ट्र सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सीमाप्रश्नी ठराव मांडण्याची सूचना केली.
विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी सीमाप्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. कर्नाटकात महाराष्ट्रविरोधी ठराव होऊनही महाराष्ट्राने केवळ बघ्याची भूमिका घेतली असून विधानसभा कामकाजात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सभागृह अध्यक्ष आणि सरकारला सीमाप्रश्नावरून घेरण्यात आले.
मागीलवेळी सीमाप्रश्नी कामकाज करणाऱ्या सल्लागार समितीमध्ये बेळगाव, कारवार, निपाणीसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र एकमुखी उभा राहील, तेथील जनतेला मदत करेल असा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आजच्या विधानसभा कामकाजात सर्व मुद्दे बाजूला ठेवून सीमाप्रश्नी विषय चर्चेला घेण्याची विनंती अजितदादा पवारांनी केली.
यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे भास्करराव जाधव आदींनीही यावेळी सीमाप्रश्नी आग्रही भूमिका मांडली. सीमाप्रश्नी ताबडतोब भूमिका घेऊन सीमावासियांच्या पाठीशी राज्य आणि राज्यातील १३ कोटी जनता उभी आहे हे देशाला दाखविण्याची गरज आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एक इंचही जागा देणार नसल्याचे सांगतात मात्र आपण आपली एक इंचही जागा तिथं न ठेवता आपल्या राज्यात घ्यायची आहे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात कणखरपणे आपली बाजू मांडण्याची गरज आहे, सत्ताधाऱ्यांच्या चालढकलपणामुळे सीमाप्रश्नी सर्वांचा अपमान होत असल्याचेही अजितदादा पवारांनी सांगितले.
यावेळी सत्ताधारी पक्षानेही संमती दर्शवत मुख्यमंत्री दिल्लीतून आल्यानंतर आज किंवा उद्या सीमाप्रश्नी ठराव मांडण्यात येईल, अशी ग्वाही दिली.