‘कच्ची नागरी भरती करण्याद्वारे सर्वसामान्य युवकाचे व्यावसायिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या चपळ, शारीरिक दृष्ट्या मजबूत, भविष्यासाठी सिद्ध आणि शिस्तबद्ध हवाई योध्यांमध्ये परिवर्तन करणे हा अग्नीवीरवायू योजनेचा मुख्य उद्देश आहे, असे भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग -इन -चीफ एअर मार्शल मनवेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले.
सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलला एअर मार्शल मनवेंद्र सिंग यांनी आज शुक्रवारी सकाळी भेट देऊन तेथे सुरू झालेल्या अग्निवीरवायू प्रशिक्षणाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
एअरमार्शल सिंग यांचे आगमन होताच एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच ट्रेनिंग स्कूलचे कार्य सांभाळणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांची त्यांचा परिचय करून दिला. यावेळी एअर ऑफिसर कमांडिंग -इन -चीफ एअर मार्शल मनवेंद्र सिंग यांनी अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थी एअरमन्सच्या प्रारंभिक प्रशिक्षणासाठी असलेल्या विविध प्रशिक्षण पायाभूत सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
तसेच पहिल्या अग्नीवीरवायू तुकडीच्या यशस्वी स्थापनेसाठी प्रारंभिक प्रशिक्षणाच्या पायाभूत सुविधा उभारल्याबद्दल सर्व वायुसैनिकांनी घेतलेल्या कठीण परिश्रमाची प्रशंसा केली.
ट्रेनिंग स्कूलच्या सर्व प्रमुख व्यक्तींनी या पद्धतीनेच कठोर परिश्रम घेऊन अग्निवीरवायू योजना यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच अग्निवीरवायू प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देताना भक्तिभाव आणि वचनबद्धतेने उच्च दर्जा राखला जावा असे सांगून त्यांनी उपस्थित प्रशिक्षकांना प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले.
अग्नीवीरवायू प्रशिक्षकांना मार्गदर्शन केल्यानंतर एअरमार्शल सिंग यांनी प्रशिक्षणार्थी अग्निवीरवायू एअरमन्सशी संवाद साधला. भारतीय हवाई दलाची एकात्मता आणि उत्कृष्टता ही मूळ मूल्य संरेखित करत देशसेवा करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षणार्थी अग्नीवीरवायू एअरमन्सना प्रेरित केले. देशात प्रथमच सुरू झालेल्या अग्निपथ योजनेतील अग्नीवीर म्हणून निवड होणे ही अत्यंत गौरवाची बाब असे सांगून या योजनेची वैशिष्ट्यांची माहिती दिली.
अग्नीवीरवायू हे सरकारने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. अग्निवीरवायू प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींची शिस्त, क्षमता, संयम आणि निष्ठा या गोष्टींची कसोटी लागणार आहे. भारतीय हवाई दल प्रशिक्षण देण्यासाठी सदैव तयार असून तुम्ही फक्त त्याचा लाभ करून घ्या. अग्निवीरवायू प्रशिक्षण हे बहुतांश डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असून त्याचा अभ्यास करण्याव्दारे देश रक्षणासाठी पुढाकार घ्यावा. शिस्त आणि समर्पण याचे महत्त्व विशद करून प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करण्यासाठी मानसिक दृष्ट्या कठीण बना आणि देशसेवेसाठी सज्ज व्हा, असे आवाहन एअरमार्शल मनवेंद्र सिंग यांनी प्रशिक्षणार्थींना केले.
याप्रसंगी सांबरा एअर फोर्स स्टेशन आणि एअरमन ट्रेनिंग स्कूलचे अधिकारी उपस्थित होते. अग्निवीर अंतर्गत भारतीय हवाई दलात भरती होण्यासाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी 2850 युवकांची निवड झाली असून या युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या ठिकाणी सुरु झाले आहे. सध्या रायफल प्रशिक्षण देण्यात येत असून विविध राज्यातील 2850 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे.