बेळगावचे सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूल अग्निवीर वायू सैनिकांच्या पहिला तुकडीला प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाले असून आज रविवारी सर्व प्रशिक्षणार्थी अग्नीवीर वायू सैनिक एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.
संरक्षण दलातील सेवेसाठी केंद्र सरकारने अलीकडेच अग्नीवीर ही युवकांसाठीची विशेष योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत हवाई दलासाठी निवड झालेले उमेदवार बेळगावच्या सांबरा एअरमन ट्रेनिंग सेंटरच्या ठिकाणी आज रविवारी दाखल झाले.
या सर्व प्रशिक्षणार्थी अग्नीवीर वायुसैनिकांची सुरक्षा तपासणी, त्याचप्रमाणे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमात रुजू करून घेण्यात आले.
देशभरातील विविध राज्यातील 2850 प्रशिक्षणार्थी अग्निवीर वायू सैनिक सांबरा येथील ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल झाले आहेत. बेळगावचे एअरमन ट्रेनिंग स्कूल गेल्या अनेक वर्षापासून देशासाठी सक्षम वायुसैनिक घडवत आहे. देशातील प्रमुख एअरमन ट्रेनिंग स्कूल पैकी एक असलेल्या या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलेले वायुसैनिक हवाई दलात उच्च पदावर कार्यरत आहेत, तर बरेच जण वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
आता शारीरिक व मानसिक दृष्ट्या कणखर व सक्षम अग्नीवीर वायूसैनिक घडविण्यासाठी येथील प्रशिक्षक सज्ज झाले आहेत. प्रशिक्षणार्थी अग्निवीर वायू सैनिकांच्या निवास व भोजनाची उत्तम सोय करण्यात आली असून त्यांचे प्राथमिक प्रशिक्षण आज रविवारपासून 29 डिसेंबर 2022 पर्यंत चालणार आहे.
या संदर्भात बोलताना सांबरा एअर फोर्स स्टेशनचे कमांडिंग ऑफिसर एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी अग्नीवीर प्रशिक्षणार्थी वायू सैनिकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्याचा असून या कालावधीत त्यांना पूर्णपणे प्रशिक्षित करून हवाई दलाच्या विविध शाखांमध्ये घडण्यात येईल अशी माहिती दिली.
एकंदर बेळगावच्या मातीत सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे अग्नीवीर वायूसैनिकांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देण्यात येत आहे ही समस्त बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.