रोटरॅक्ट क्लब ऑफ केएलई सीबीएएलसी यांच्यातर्फे रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि फोरम ऑफ फ्री इंटरप्राईज यांच्या सहकार्याने आयोजित 56 वी ए. डी. श्रॉफ स्मृती आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत मिथिला देसाई हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
सदर वक्तृत्व स्पर्धा 1965 पासून दिवंगत ए. डी. श्रॉफ यांच्या स्मरणार्थ आयोजित केली जाते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अर्थकारणासह त्यासंबंधीच्या अन्य विषयांवर चिंतन करून आपले विचार मांडता यावेत, शिवाय आपले वक्तृत्व कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते.
बेळगाव शहरातील केएलई सोसायटीच्या कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, लिंगराज कॉलेजच्या (सीबीएएलसी) सभागृहामध्ये काल गुरुवारी या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत मिथिला देसाई, चारुशीला साळुंखे, फैजान मर्फनइ, मुजाहिद काझी आणि अश्ना चुडसामा यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक पटकाविला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून केएलएस आयएमइआर टोस्ट मास्टर क्लबच्या अध्यक्षा चित्रा वीरेश, आयसीएसआय बेळगाव शाखा व्यवस्थापन समितीचे सदस्य -कंपनी सेक्रेटरी सुधीर सुतार, केएलएस आयएमइआरचे संचालक डॉ. आरिफ शेख आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ केएलई सीबीएएलसीच्या समन्वयक डॉ. नंदिनी फ्रान्सिस हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना आकर्षक रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.