कचरा फेकताना दोन दुचाकी स्वारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून चौघा जणांनी एका युवकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना काल मंगळवारी रात्री भाग्यनगर येथे घडली.
आशिष शेणवी (रा. भाग्यनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. चौघा युवकांनी त्याच्यावर हल्ला करून दगडाने मारहाण केल्यामुळे आशिषच्या कपाळाला आणि डोळ्यांना दुखापत झाली आहे.
काल मंगळवारी रात्री आशिष हा आपल्या दुचाकीवरून भाग्यनगर फर्स्ट क्रॉस येथील दत्त मंदिरानजीक कचरा टाकण्यास निघाला होता. त्यावेळी कचरा फेकताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटरसायकलला अनावधानाने त्याचा हात लागला.
त्यावरून संबंधित मोटर सायकलस्वार आणि आशिष यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी त्या दुचाकीस्वाराने आपल्या तिघा मित्रांना बोलवून घेतले. त्यानंतर जोरदार बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान आशिषला जबर मारहाण करण्यामध्ये झाले.
आरडाओरडीसह सुरू असलेल्या या मारामारीमुळे स्थानिक नागरिक जमा होऊ लागताच हल्लेखोराने आपली मोटरसायकल तेथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलीस आरोपी युवकांचा शोध घेत आहेत.