नियोजित रिंग रोडच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवार दि 28 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचा भव्य चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात येळ्ळूर येथील शेतकऱ्यांची शाळकरी मुले देखील सहभागी होणार असून त्यासाठीची जय्यत तयारी त्यांनी सुरू केली आहे.
बेळगाव रिंग रोडच्या विरोधात उद्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा चाबूक मोर्चा काढून निवेदन सादर केले जाणार आहे. एकीकडे आपल्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रिंग रोड विरोधातील आपला आपला लढा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कंबर कसली असताना दुसरीकडे येळ्ळूर येथील शेतकऱ्यांची शाळकरी मुले देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी उत्सुक झाली आहेत.
ही मुले फावडा, बुट्टी व आकडी घेऊन चाबूक मोर्चात सामील होणार असून त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. या मुलांनी निषेधाचे फलकही तयार केले आहेत.
बेळगाव शहरवासियांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शहरवासीयांनो अन्नधान्य, भाजीपाला शेतात पिकतो स्लॅब वर नाही.
जमीन राहिली तर तुम्हाला अन्नधान्य, दूध, दही मिळणार अन्यथा फास्ट फुडवर जगण्याची वेळ येईल. वेळीच शहाणे व्हा आणि हजारोच्या संख्येने तुम्ही देखील चाबूक मोर्चात सहभागी होऊन आमची पिकाऊ जमीन वाचवा. जय जवान जय किसान, असे आवाहन येळूरच्या बालगोपाळांनी केले आहे.