चिकोडी उपविभागातील निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, अवैध जुगार, अवैध दारू विक्री अशा बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या आणखी 2 आरोपींना तडीपार करण्याचे आदेश चिक्कोडी प्रांताधिकार्यांनी जारी केले आहेत.
चंद्रकांत शंकर वड्डर (रा. अकोळ, ता. निपाणी) आणि संजय चंद्रकांत परकट्टी (रा. जमादार प्लॉट, ता. निपाणी) अशी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी चंद्रकांत वड्डर हा मटका जुगार आणि
बेकायदेशीर दारू विक्री आधी सुमारे 36 प्रकरणात सहभागी असून त्याला चिकोडी उपविभागातून कोलार जिल्ह्यात 9 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. संजय चंद्रकांत परकट्टी हा सुमारे 4 बेकायदेशीर प्रकरणांमध्ये गुंतला असून त्याला रामदुर्ग तालुक्यात हद्दपार करण्यात आले आहे.
यापूर्वी विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या 14 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना चिक्कोडी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी संतोष कामगौडा यांच्या आदेशावरून हद्दपार करण्यात आले होते.
आता आणखी दोघांना तडीपार करण्यात आले आहे. या पद्धतीने पोलिसांना डोकेदुखी ठरलेल्या एकूण 16 जणांवर कारवाई करण्यात आल्यामुळे अवैध धंदे, गुन्हेगारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.