आम्ही लहान असताना तुळशीचे लग्न म्हणजे खूप मजा असायची.गुळ पोहे आणी पंचखाद्याचा प्रसाद मिळायचा.खीर पोरीचं जेवण असायचं.हीला देव दिवाळी किंवा मोठी दिवाळी म्हणायचे. मातीचे वृंदावन झेंडुची फुलं आणी पणत्यानी सजवलं जायचं.भोवताली सुंदर रांगोळी काढलेली असायची.
लग्नानंतर अशाच थाटात आम्ही अजूनही तुळशीचे लग्न करतो.दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत सुरूच असते असं म्हटलं जातं. तुळशीचं लग्न झालं, की दिवाळी संपते.तुळशीशी विवाह सोहळा कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात.
तुळशी विवाहाचे हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशीला नवीन वस्त्र पांघरले जातात. दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.
हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात.
आपल्या कुठल्याही सणाची एक गोष्ट असते. तशीच ती तुळशीच्या विवाहाचीही आहे. ही प्रथा कधी सुरू झाली? त्याचं कारण काय? या सगळ्या गोष्टी एका कथेमध्ये आहेत.
तुळशी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची. मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला मुलगी झाली, त्याने तिचं नाव वृंदा असं ठेवलं. तर ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त. वृंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंदर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं.वृंदा ही विष्णूची पुजा करायची.
तीच्या पुण्यामुळे जालंदरची ताकद वाढायची.पुढे देवाना याचा त्रास व्हायला लागला.म्हणून देवानी विष्णूला विनंती केली.विष्णू जालंदरच्या रुपात येऊन वृंदेचं शील हरण केलं
त्या नंतर श्री विष्णूनी खरे रूप धारण करून वृंदा समोर उभे राहिले . विष्णूंना बघून वृंदा म्हणाली ज्यांची मी एवढी भक्ती करते त्या विष्णुंनीचं मला फसवले. त्यानंतर वृंदाने श्री विष्णूंना चिडून श्राप दिला. ज्या प्रमाणे तुमच्या भक्ताला तुम्ही हृदय शून्य दगडासारखे वागलात म्हणून मी तुम्हाला श्राप देते कि तुम्ही दगड व्हाल.
श्राप देते कि तुम्ही दगड व्हाल.
त्या नंतर श्री विष्णू हे दगड झाले आणि तो दगड म्हणजेच शाली ग्राम. परंतु हळू हळू तो दगड म्हणजेच शालीग्राम मोठा होऊ लागला आणि हळू हळू संपूर्ण विश्वाचा त्याने व्यापले जाईल अशी भीती पुन्हा देवतांच्या मनात अली आणि जर असे झाले तर संपूर्ण सृष्टी हि धोक्यात येईल . त्यामुळे परत सर्व देव हे लक्ष्मी सकट
वृंदेची प्रार्थना करू लागले .
त्यानंतर वृंदेने सर्व देवांची विनंती स्वीकार करून विष्णूंचा दिलेला श्राप मागे घेतला . आणि त्यानंतर विष्णू पूर्व अवतारात आले. त्यानंतर जालंधराचे शीर म्हणजेच मुंडी मांडीवर घेऊन ती सती गेली आणि तिची राख झाली . त्या राखेतून एक रोप जन्माला आले आणि त्या झाडाचे नाव विष्णूंनी तुळस असे ठेवले. आणि त्या तुळशीला वरदान दिले कि तुळस सोबत नेहमी शालीग्राम असेल.
तसेच प्रत्येक पूजेत तुळशीला महत्व दिले जाईल. आणि त्याचा बरोबर प्रत्येक घरात तुळशीचे झाड असेल . आणि नैवद्य देतांना तुळशी चे पान अर्पण केले जाईल. आणि तुळशी पत्र म्हणजेच तुळशीची पाने ठेवलेली कोणतीही गोष्ट हि भगवान विष्णू पर्यंत लगेच पोहचेल. मग तो नैवद्य असू शकतो किंवा दान , असो किंवा अजून काही असो . असे कथन विष्णूनी केले .
हि संपूर्ण घटना कार्तिक मास मध्ये घडली म्हणून ह्या कार्तिक महिन्यात तुळशीचा विवाह केला जातो . आणि त्या नंतरच लग्नाचे मंगल मुहूर्त हि काढले जातात . तुळशीच्या लग्न नंतरच लग्न मुहूर्त सुरु होतात म्हणजेच लग्न आरंभ होतात .
–लालन प्रभू,माजी नगरसेविका मनपा बेळगाव.