बेळगाव लाईव्ह विशेष : आधुनिकीकरणाच्या जगात आज भावनांचा टिकाव आणि निभाव दोन्हींचा ठाव नाही. झटपट आणि सुपरफास्ट यश मिळविण्यासाठी आज प्रत्येकजण आपल्या जीवाची कसोटी लावत आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी, प्रेम, लग्न, आर्थिक अडचणी, कौटुंबिक तक्रारी, मानसिक खच्चीकरण यासह अनेक कारणांमुळे आज जीव दावणीला लावला जात आहे. स्पर्धात्मक जगात टिकाव लागावा यासाठी आज जो तो प्रयत्न करतोय. यश, पैसा आणि प्रसिद्धी, मानापमान यामागे बिनधास्त धावताना चुकून अपयश आले तर ते अपयश न पचवता टोकाचा निर्णय घेण्यात येतो. आत्महत्येसारखा मार्ग निवडला जातो. परंतु ‘आत्महत्या’ हा कोणत्याही अडचणींवरील पर्याय नाही, हे कित्येकांच्या लक्षात येत नाही.
नुकत्याच समोर आलेल्या आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कार्यकाळात बेळगावमध्ये तब्बल १२४० जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी ८० टक्के आत्महत्या या विविध कारणामुळे झाल्या असून २० टक्के आत्महत्या विद्यार्थ्यांच्या असल्याचे समोर आले आहे. आभासी आणि कल्पनाविश्वात रमू पाहणाऱ्या प्रत्येकाला आज समुपदेशनाची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनात येत असून शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे समुदेशन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जाणवत आहे. आपल्या मनासारखे घडले नाही कि विरोध करणे किंवा टोकाची पावले उचलणे हा मानवी स्वभावाचा गुणधर्म आहे. मात्र आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीसाठी पर्याय नसून यासाठी मानसिक प्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज नात्यांमधील संवाद हरवत चालला आहे. यामुळे आज तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. कुटुंबात मोठ्या व्यक्तीचे मार्गदर्शन न लाभल्याने अलीकडे तरुण पिढी नैराश्यग्रस्त जीवन जगत आहे. सहनशीलता न जपणाऱ्या तरुण पिढीला सध्या संवादाची खरी गरज आहे. पालक आणि पाल्यामधील संवादाची दरी ही देखील आत्महत्येमागची समस्या असू शकते. वास्तवापासून दूर राहणाऱ्या मुलांना आभासी जगात राहणे पसंत आहे. त्यामुळे वेळोवेळी वास्तवाचे भान करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. हल्ली लहान मुळापासून वयोवृद्ध व्यक्तींसाठी मोबाईल ही व्यसन लावणारी वस्तू बनली आहे. मात्र अति तंत्रज्ञानामुळेही विपरीत परिणाम झालेले आपण पाहत आलो आहोत. गेम्स, व्हिडीओ बघण्यात वेळ वाया घालवणाऱ्या मुलांना आभासी जगात रमायला आवडू लागल्याने वास्तवाची जाणीव झाली कि आत्महत्येसारख्या टोकाचे पाऊल उचलले जाते. मोबाईल, महागड्या गाड्या यासाठी हट्ट करणाऱ्या मुलांना लहानवयातच पैशांचे महत्व पटवून दिले पाहिजे. शाळा-महाविद्यालयीन पातळीवर अभ्यासक्रमात व्यक्तिमत्व विकास वर्ग समाविष्ट करण्यासाठी शैक्षणिक धोरणात सुधारणा केली पाहिजे. शाळकरी मुलांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शाळा आणि शिक्षण संस्था या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांसह आज अनेकांचा निर्णय आत्महत्येसारख्या दिशेने वहावत चालला आहे. कुणी आर्थिक टंचाईमुळे तर कुणी कौटुंबिक अडचणींमुळे, मानापमान, प्रेमप्रकरणे यासारख्या अनेक कारणांमुळे आज आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. नैराश्य, तणाव येणे हे साहजिक आहे. मात्र या नैराश्यातून जीवन संपवून टाकण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत चुकीचे आहे. आपल्या समोर येणाऱ्या आव्हानांना कणखरपणे, खंबीरपणे तोंड देत संघर्ष केला पाहिजे. आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणेही अत्यंत गरजेचे आहे.