कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या समस्येची दखल अखेर महाराष्ट्राच्या सीमाभाग समन्वय मंत्र्यांनी घेतली असून बेळगाव प्रश्नी चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 3 डिसेंबर रोजी मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही बेळगाव दौऱ्यावर येणार असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावला येऊन कार्यकर्त्यांची चर्चा करावी अशी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभूराज देसाई 3 डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. भेटूया, चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो, असे ट्विट महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे सीमाभाग आणि महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नेमणूक केलेल्या दोन्ही समन्वयक मंत्र्यांनी बेळगाव आणि सीमा भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना ऐकून घ्याव्यात अशी सीमा भागातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
याची दखल घेऊन उभय समन्वयक मंत्र्यांनी लवकरच बेळगावात येऊन चर्चा करावी, अशी मागणी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर व खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केली होती.