बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र २३ नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी काही दिवसांसाठी पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खंडपीठात न्यायमूर्ती या सुनावणीदरम्यान उपस्थित राहणार नसल्याने सदर सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याआधी ३० ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत कर्नाटक सरकारच्या वकिलांनी अधिक वेळ मागितला होता. आपल्याला तयारीसाठी वेळ मिळाला नसल्याचे कारण देत सुनावणी लांबणीवर टाकण्याची विनंती न्यायमूर्तींकडे केली होत. यावेळी पुढील सुनावणीसाठी २३ नोव्हेंबर हि तारीख जाहीर करण्यात आली होती.
न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्यष्ठ विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान खंडपीठातील न्यायमूर्ती अनुपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
सदर सुनावणी चार-पाच दिवसांनी पुढे ढकलण्याची शक्यता असून यामुळे सोमवारी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या वकिलांना तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे, हि यातील सकारात्मक बाब आहे. अद्याप सुनावणीसंदर्भातील अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली नसून सूत्रांनी दलेल्या माहितीनुसार मात्र हि सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.