बेळगाव लाईव्ह विशेष : मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर कोणत्याही संकटावर मात करता येते. हेच सिद्ध करून दाखवलंय बेळगावमधील रेणुका हुंदरे यांनी! माजी नगरसेविका लालन प्रभू यांच्या घरात बागकाम आणि घरकामात मदत करणाऱ्या रेणुका हुंदरे यांचा प्रवास अत्यंत खडतर असा आहे. रेणुका हुंदरे यांना कामाची गरज होती त्यामुळे १९९६ मध्ये लालन प्रभू यांच्या घरी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. लालन प्रभू यांच्या छतावर अनोख्या प्रकारचे टेरेस गार्डन आहे.
नानाविध प्रकारच्या फळा-फुलांची अख्खी बाग असलेल्या या टेरेस गार्डनची देखभाल रेणुका हुंदरे गेल्या २५ वर्षांपासून करत आहेत. दहावीपर्यंतचे शिक्षण पण या बागेत असणाऱ्या प्रत्येक झाडांची नावे त्यांना तोंडपाठ आहेत. इतकेच नाही तर त्यांचा तोंडी हिशोब देखील वाखाणण्याजोगा आहे.
पतीच्या निधनानंतर न डगमगता स्वतःच्या हिमतीवर त्यांनी आपल्या तीन मुलांचा सांभाळ केला. त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी आज स्वतःच घरकुल उभं केलं. जवळपास १९-२० वर्षांच्या वयातील तिन्ही मुले आज रेणुका हुंदरे यांचा आधार बनली आहेत. २५ वर्षांच्या अपार कष्टांनंतर स्वतःच्या हक्काच्या घरात त्या वास्तव्यासाठी जात आहेत.
रेणुका हुंदरे यांच्याबद्दल लालन प्रभू सांगतात, “आपल्या घराची आणि बागेची जबाबदारी घेणारी रेणुका कधी आपल्या घराचा आणि मनाचा भाग झाली, हे कळलेच नाही. तिच्या कष्टाचा, प्रामाणिकपणाचा आणि जिद्दीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. तिच्यासोबतची २५ वर्षे कधी निघून गेली आणि कधी ती आपल्या घरातील प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनली हे कळले नाही. आज तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने तिचे स्वतःचे घरकुल उभारले असून या गोष्टीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. यापुढे ती आपल्याकडे कामासाठी येणार नाही याची रुखरुख तर लागलीच पण ती तिच्या हक्काच्या घरात जात असल्याचा आनंदही आहे. तिच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा इतर कष्टकरी महिलांसमोर आदर्श उभा आहे”.
आपल्या घरात काम करणाऱ्या अनेक महिला या केवळ कामापुरत्या आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत असे अनेकवेळा घडते. मात्र आपल्या घराची जबाबदारी स्वतःच्या घराप्रमाणे घेऊन लळा लावणाऱ्या महिलांचीही काही कमी नाही.
पारिजातकाच्या झाडाप्रमाणे स्वतःचा चरितार्थ चालविण्यासाठी इतरांच्या घरात काम करणे हेदेखील एक आव्हानच असते. वरवर छोट्या वाटणाऱ्या परंतु महत्वपूर्ण अशा कामातून स्वतःच्या घरासाठी यश मिळविलेल्या रेणुका हुंदरे यांच्या कष्टाला आणि जिद्दीला सलाम.. आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
-लालन प्रभू ,माजी नगरसेविका बेळगाव.