सौंदत्ती येथे पुढील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या श्री रेणुका देवी यात्रेसंदर्भात कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना कोल्हापूर यांच्यातर्फे विविध मागण्यांचे निवेदन आज बुधवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्री रेणुका देवीची यात्रा येत्या 5 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत होणार आहे. सदर यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापूर येथून लाखो भाविक सौंदतीला येत असतात. हे भाविक भाड्याच्या एसटी बसेस, खाजगी प्रवासी वाहने अथवा स्वतःच्या वाहनांनी यात्रेसाठी येतात.
या भक्तमंडळींची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुढील सुविधा पुरवाव्यात. बसेसमध्ये महिलांसह जेवणाचे साहित्य, राहुट्या -तंबूचे साहित्य वगैरे असते. त्यामुळे बस गाड्यांना थेट निवासी स्थळांपर्यंत जाण्याची परवानगी दिली जावी.
देवीचे खास दर्शन व इतर दर्शनासाठीचे दर कमी ठेवावेत. रेग्युलर पार्किंग आणि एक्स्ट्रा टॅक्सचे दर माफक असावेत. एंट्री आणि पार्किंगच्या दराचे फलक मोठ्या अक्षरात इंग्रजीमध्ये असावेत. डाॅमेट्री आणि देवस्थान भक्त निवासाच्या खोल्या स्वच्छ सुस्थितीत असाव्यात. वीज पुरवठा व स्वच्छ पाणीपुरवठा सतत सुरू ठेवला जावा. देवीच्या पूजेचे लाईव्ह टेलिकास्ट स्क्रीन्स मंदिर आवारात उभारले जावेत.
मंदिर आणि लॉजिंगचा परिसर जंतुनाशक फवारणी करण्याद्वारे स्वच्छ ठेवला जावा. यात्रेला येणाऱ्यांमध्ये महिला भाविकांची संख्या मोठी असते हे लक्षात घेऊन पोलीस व सुरक्षा रक्षक नेमणुकीद्वारे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली जावी. यात्रेच्या कालावधीत मद्य विक्री व मांस विक्रीवर कडक निर्बंध घातले जावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून त्यांची पूर्तता करण्याची नम्र विनंती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपरोक्त निवेदनाच्या प्रती कार्यकारी अधिकारी श्री रेणुका मंदिर देवस्थान सौंदत्ती, जिल्हा पोलीस प्रमुख बेळगाव आणि सौंदत्ती पोलीस स्थानक सौंदत्ती यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.