”लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या दिल्ली येथील जोडप्यामधील श्रद्धा नामक तरुणीची निर्घृणपणे केलेली हत्या आणि या हत्याकांडानंतर धक्कादायक पद्धतीने उघड झालेले तिच्या आफताब या तिच्या प्रियकराचे खुलासे यानंतर संपूर्ण देशभरात या घटनेवरून व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेत बेळगावमध्ये ‘श्रद्धा’ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी खबरदारी घेत महिलावर्गाला आवाहन केले आहे.
बेळगावमध्ये निदर्शनात आलेल्या घटनेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर तरुणींना आणि महिलावर्गाला आवाहन करत स्वतःची सुरक्षितता जपण्याचा सल्ला दिला आहे. बेळगावमधील शाळा क्रमांक ५ येथे हा प्रकार उघडकीस आला असून जम्मू काश्मीर मधील एक तरुण बेळगावमधील लिंगायत समाजातील एका तरुणीला दररोज फूस लावून आपल्या दुचाकीवरून घेऊन जात असल्याचे निदर्शनात आले.
कॅम्प परिसरात कामानिमित्त जाणाऱ्या तरुणीला दररोज दुचाकीवरून ने-आण करणाऱ्या या तरुणाचा हेतू योग्य वाटला नसल्याने सदर बाब मार्केट पोलीस स्थानकाच्याही निदर्शनात आणून देण्यात आली.
यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी तमाम महिलावर्गाला एक आवाहन केले असून, सर्व तरुणी, शालेय विद्यार्थिनी आणि महिलावर्गाने स्वतःच्या सुरक्षेसाठी सक्षम असावे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, आपल्या पालकांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावेत.
आपल्या समाजात आपली प्रतिष्ठा पणाला लागणार नाही याची काळजी घ्यावी, आणि दिल्लीत झालेल्या श्रद्धा हत्याकांडावरून बोध घेऊन आपण कसे वागावे हेदेखील ठरवावे आणि खबरदारी बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे.