बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण गेल्या दोन दिवसांपासून ढवळून निघाले आहे.
याविषयावर महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून प्रतिक्रिया दिल्या असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सीमाप्रश्न आणि कर्नाटक सरकारच्या विधानांना आव्हान देत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना रोखठोख इशाराही दिला.
आम्हाला जर बेळगाव, कारवार, निपाणी देणार असाल तर जतमधील गावांची चर्चा करू, अशा शब्दात शरद पवार यांनी बोम्मईंना प्रत्त्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने याविषयी तात्काळ भूमिका जाहीर करावी, सीमाप्रश्नी भाजपाला भूमिका टाळता येणार नाही, अशी सूचनाही त्यांनी दिली.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी यासह ८६५ खेडी महाराष्ट्रात सामील करण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा सुरु आहे. या लढ्यात महाराष्ट्राने सातत्याने पाठिंबा दिला असून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी बहुल भाग सोडायची तयारी दाखविली तर त्यांना काय काय देता येईल, यावर चर्चा करू. परंतु काहीही न देता अशा प्रकारची वक्तव्ये करणे हे शहाणपणाचे लक्षण नसल्याची खोचक टीकाही शरद पवार यांनी केली.