Saturday, November 9, 2024

/

…तर आमदारकीचा राजीनामा देईन…! “त्या’ विधानावर अखेर स्पष्टीकरण!

 belgaum

केपीसीसी कार्याध्यक्ष  सतीश जारकीहोळी यांनी हिंदू या शब्दाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला असून सतीश जारकीहोळी यांनी आज आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

निपाणी येथे झालेल्या मानव बंधुत्व संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांची जीभ घसरली आणि  हिंदू या शब्दाचा अर्थ सांगताना त्यांनी,  “हिंदू शब्द का अर्थ बहुत गंदा है!” हे सांगत, हिंदू हा शब्द फारसी भाषेतून आल्याचे त्यांनी म्हटले.  हिंदू हा शब्द भारताचा नाही, आमच्यावर जबरदस्ती केली जात असून या शब्दाचा अर्थ अतिशय घाणेरडा असल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंदू हा शब्द फारसी भाषेतून आला,  हिंदू हा शब्द कसा आला यावरुन विचार मंथन झाले पाहिजे, इराक, इराण, कझाकस्तान, याचा भारताशी काय संबंध? असा सवाल उपस्थित करत  जर तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थ माहित असेल तर तुम्हाला त्याची लाज वाटेल असं वक्तव्यही त्यांनी केलं. त्यांच्या या विधानावरून भाजपसह अनेक संघ संस्थांनी हल्लाबोल चढविला आहे. जारकीहोळी यांच्या या भाषणाशी संबंधित एक व्हिडिओ क्लिपही समोर आली असून ती सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे.

या साऱ्या प्रकारानंतर विरोधकांनी जाहीरपणे सतीश जारकीहोळी यांनी माफी मागावी अशी मागणी केली असून यानंतर सतीश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले. आपण केलेले विधान हे वोटबँकेसाठी नसून सत्यपरिस्थीतीशी निगडित असल्याचे ते म्हणाले. आपण केवळ हिंदू शब्दाचा अर्थ आणि या शब्दाचा उगम  कुठून झाला याबाबत बोललो. माझ्या वक्तव्यात कुणालाही दुखावण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. मात्र आपण केलेले वक्तव्य हा एखादा गुन्हा असेल असे मला वाटत नाही. आज राज्यात पंचमसाली समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. या लढ्याचा राजकारणाशी किंवा निवडणुकीशी संबंध नाही.Satish jarkiholi

पंचमसाली समाजासह उप्पार आणि कुरबर समाज यासह अनेक समाजाची आंदोलने सुरु आहेत. आपले वक्तव्य हे सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारे असून यावर विरोधकांनी राजकारण करू नये. या विषयावर आपण जाहीरपणे चर्चा करण्यासाठी देखील तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वक्तव्यावर सखोल चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करा किंवा तज्ज्ञांना बोलवा, आपण जाहीरपणे चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे सतीश जारकीहोळी म्हणाले.

आपल्या समाजाला मागासवर्गीय समाज म्हणून अनेकवेळा हिणवण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनीदेखील आपल्याला अनेक प्रश्न विचारले आहेत. याची आता आपल्याला सवय झाली असून गेली ३० वर्षे आपण हे सर्व अनुभवले असल्याचे सतीश जारकीहोळी म्हणाले. मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी आपण माफी मागावी अशी मागणी केली आहे. मात्र आपण केलेले वक्तव्य हे चुकीचे असल्याचे सिद्ध केल्यास आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ, असे आव्हान देखील त्यांनी दिले.

आपल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करावी, समितीने अहवाल द्यावा, आपण केलेलं वक्तव्य चुकीचं ठरवून गुन्हा सिद्ध करावा, असे झाल्यास केवळ आमदारकीचाच राजीनामा नाही तर राजकारणालाच राम राम ठोकेन असे स्पष्टीकरण आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.