बेळगावात घरफोड्या करून गोव्यातील कॅसिनोमध्ये चैनी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना बेळगाव पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील सोन्या -चांदीचे दागिने असा सुमारे 80 लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.
पोलीस आयुक्तालयामध्ये आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या चोरट्यांची नावे प्रकाश पाटील (वय 37, मूळ. रा वडगाव बेळगाव, सध्या रा. झरीवाडा साखळी -गोवा) आणि महेश रामा केळगीनकोप्प (वय 37, मूळ रा. खानापूर, सध्या रा. वैभववाडी सिंधुदुर्ग) अशी आहेत. या जोडगोळीकडून बेळगाव पोलिसांनी सुमारे 75 लाख रुपये किमतीचे दीड किलो सोन्याचे दागिने, सुमारे 3 लाख रुपये किमतीचे 4 किलो चांदीचे दागिने, 1 लाख 80 हजार रुपये रोकड आणि एक बजाज डॉमिनर बाईक जप्त केली आहे. या दोघांचा बेळगाव आणि परिसरातील एकूण 13 घरफोड्यांमध्ये हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस उपायुक्त स्नेहा पी. व्ही., मार्केट उपविभागाचे एसीपी नारायण बरमनी व खडेबाजार उपविभागाचे एसीपी चंद्राप्पा यांच्या नेतृत्वाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथकांनी प्रकाश पाटील व महेश केळगीनकोप्प या चोरट्यांना गजाआड करून त्यांच्याकडील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली.
बेळगाव, धारवाडसह आसपासच्या तीन-चार जिल्ह्यात आरोपींनी घरफोड्या केल्या आहेत. बेळगावातील 13 प्रकरणं वगळता आणखी 22 प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी दिली. अटक केलेल्या दोघांनी बेळगाव बाहेर केलेल्या चोरी -घरफोडी प्रकरणांचा तपास सुरू असून आरोपींना कस्टडीत घेऊन चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मूळचा वडगाव बेळगाव येथील असलेला प्रकाश पाटील हा सध्या गोव्याला राहत असला तरी तो गोव्याहून चोरी करण्यासाठी बेळगावात येत होता. बेळगावात चोऱ्या घरफोड्या करून आपण गोव्यातील कॅसिनोमध्ये जाऊन चैनी करत असल्याचा कबुली जबाब दोन्ही आरोपींनी दिला असल्याचेही पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त स्नेहा पी. व्ही., एसीपी बरमनी, एसीपी चंद्रप्पा यांच्यासह संबंधित अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या माहितीसाठी जप्त करण्यात आलेले सोन्या -चांदीचे दागिने देखील प्रदर्शनार्थ मांडण्यात आले होते.