शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने म्हणजे तब्बल 823 आक्षेप नोंदवून मदत केल्यामुळे बेळगाव रिंग रोड विरोधातील लढा भविष्यात तीव्र केला जाणार आहे. त्या अनुषंगाने लढ्याची रूपरेषा ठरविण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या रविवार दि. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता ओरिएंटल शाळेच्या तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात व्यापक बैठक बोलाविली आहे.
बेळगाव तालुक्यातील सुपीक जागेतून रिंग रोड जाणार आहे. त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीने शेतकऱ्यांच्या बाजूने किल्ला लढवताना शेतकऱ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी वकिली मदत मिळवून दिली आहे.
त्यामुळे सुमारे 80 टक्के शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. आता या आक्षेपानंतर रस्त्यावरील लढायला प्रारंभ होणार आहे. रिंग रोड झाल्यास तालुक्यातील सुपीक जमीन जाऊन सर्व शेतीवर गंडांतर येणार असल्यामुळे समितीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
रिंग रोडला विरोध करून आक्षेप नोंदविण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. रिंग रोडला आक्षेप नोंदवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात आक्षेप आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत रिंग रोडला जमीन देणार नाही असा निर्धार केलेल्या तब्बल 823 शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविले आहेत.
बेळगाव शहराच्या सभोवताली होणाऱ्या रिंग रोडमुळे 31 गावातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रस्त्यावरील लढाईसाठी उद्या रविवारच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांवर चाबूक उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तेव्हा ओरिएंटल शाळेच्या ठिकाणी होणाऱ्या या बैठकीस पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, आता आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याबाबत कधी सुनावणी घेणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे. कोणत्याही ठिकाणी भूसंपादनाला 75 टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवले तर भूसंपादनाचा निर्णय रद्द करावा लागतो. त्यामुळे रिंग रोड विरोधात मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आक्षेपांची दखल महामार्ग प्राधिकरण घेणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.