बेळगावच्या नियोजित रिंग रोड विरोधात येत्या सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा चाबूक मोर्चा हा विराट होणार असला तरी कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेत अत्यंत शिस्त पद्धतीने शांततेत हा तो यशस्वी केला जाईल, अशी ग्वाही बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पोलीस प्रशासनाला दिली.
बेळगावच्या नियोजित रिंग रोड विरोधात येत्या सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विराट मोर्चाचे नियोजन जाणून घेण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाने आज शनिवारी सकाळी बोलावलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
संचयनी सर्कल येथील खडेबाजार पोलीस उपविभाग कार्यालयाच्या ठिकाणी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एसीपी चंद्रप्पा हे होते. यावेळी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी बेळगावच्या नियोजित रिंग रोडमुळे शेतकरी कशा पद्धतीने देशोधडीला लागणार आहेत याची माहिती दिली. रिंग रोड प्रकल्प संदर्भात नोटिफिकेशन जारी झाल्यापासून त्याच्या विरोधात कायदेशीर लढ्यासोबतच समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी रस्त्यावरील लढाईसाठी उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उध्वस्त करणाऱ्या या रिंग रोड ऐवजी फ्लाय ओव्हर ब्रिज प्रकल्प राबवावा अशी मागणी ही करण्यात आली आहे. तशा आशयाचा प्रस्तावही सरकारला धाडण्यात आला आहे. मात्र तरीही सरकारने रिंग रोडचा प्रकल्प मागे घेतलेला नाही. त्यामुळे गेल्या दीड -दोन महिन्यापासून रिंग रोडच्या विरोधात जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे येत्या 28 नोव्हेंबर रोजीचा चाबूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी संबंधित 32 गावांसह ठिकठिकाणी अहोरात्र बैठका घेऊन तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येने शेतकरी, नागरिक, कार्यकर्ते आणि संघ-संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत, असे किणेकर यांनी सांगितले.
मोर्चाच्या नियोजनाबद्दल बोलताना येत्या सोमवारी सकाळी 10:30 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून मोर्चाला प्रारंभ होईल. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रिंग रोड ज्या गावातून होणार आहे त्या 32 गावातील शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय तसेच शहर व तालुक्यातील शेतकरी ध. संभाजी चौक येथे दाखल होणार आहेत. हे शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली, टेम्पो आदी वाहनांद्वारे ध. संभाजी चौकात येऊन उतरतील. त्यानंतर त्यांची रिकामी झालेली वाहने सरदार मैदानावर नेऊन पार्क केली जातील. ध. संभाजी चौक येथून सुरू होणारा मोर्चा यंदे खूट, कॉलेज रोड, कित्तूर चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. या सभेत नेतेमंडळींची भाषणे झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले जाईल.
मोर्चात सहभागी होणाऱ्या मोर्चेकर्यांची गैरसोय होऊ नये यासाठी टँकर आणि पाणपोईच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची पाकिटेही वाटली जातील. मोर्चासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिक सकाळी लौकर घराबाहेर पडणार असल्यामुळे तसेच त्यानंतर मोर्चा सुरू होऊन तो समाप्त होईपर्यंत दुपार होणार असल्यामुळे गावागावातून येणाऱ्या लोकांना स्वतःसोबत भाकरी -भाजी, पुलाव वगैरे न्याहरी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
मोर्चामध्ये सहभागी मोर्चेकरांच्या हातात रिंग रोड विरोधातील निषेध असे फलक आणि चाबूक असेल. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या ध्वज तसेच राजकीय पक्षांच्या फलकांना मोर्चात थारा दिला जाणार नाही असे उपस्थित नेत्यांनी स्पष्ट केले. सदर चाबूक मोर्चा कायदा व सुव्यवस्थेला बाधा न पोहोचवता अत्यंत शिस्तबद्धरित्या शांततेत काढला जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. तसेच ग्रामीण भागातून मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्यांची वाहने कृपया पोलिसांनी कोठेही अडवू नयेत अशी विनंतीही माजी आमदार मनोहर किणेकर व उपस्थितांनी केली.
बैठकीस कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धरमट्टी यांच्यासह तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, मध्यवर्तीचे समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, समिती नेते शिवाजी सुंठकर, आर एम चौगुले ॲड. श्याम पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, पुंडलिक पावशे, आदी उपस्थित होते.