आपण जेडीएस मध्ये प्रवेश घेणार असल्याबाबत खोट्या अफवा पसरविल्या जात असून, कोणत्याही कारणास्तव मी भाजप सोडणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांना दिले. बेळगाव ग्रामीण मतदार संघातील बेळगुंदी गावात एका काजू फॅक्टरीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसारमाध्यमांना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसमधील मंत्रिपद सोडून आपण भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सरकार स्थापन केले. आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी आपण कोणाशी संपर्क साधला नाही. माझ्या मंत्रिपदासाठी मी दिल्लीला गेल्याची बातमी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आली आहे.
मात्र मला भाजपमधून मंत्रिपद नाही मिळाले तरी आपण भाजप सोडून इतर पक्षात प्रवेश घेणार नाही, आपल्या पक्षाशी आपण प्रामाणिकपणे बांधील राहू, आणि २०२३ साली पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करू, असेही स्पष्टीकरण रमेश जारकीहोळी यांनी दिले.
![Ramesh jarkiholi](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2021/12/USER_SCOPED_TEMP_DATA_orca-image-1638360792721_6871783226359666051.jpeg)
अद्याप मंत्रिपद का देण्यात आले नाही? या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना रमेश जारकीहोळी म्हणाले, भाजप नेते आपल्या संयमाची परीक्षा घेत असतील, मात्र २०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप मला महत्वाची जबाबदारी देईल याची खात्री आहे. मी मंत्री जरी झालो नाही तरी भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१९९४ साली देवेगौडा यांनी आपल्याला जनता दलात येण्यासाठी सांगितले. मात्र त्यावेळी मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होतो. काँग्रेस पक्षाने माझी फसवणूक केली नाही तर नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता भाजप पक्षात राहून निष्ठावंत म्हणून मी पक्षाची सेवा करेन असेही रमेश जारकीहोळींनी स्पष्ट केले.