ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि संगम संस्थेच्या वतीने लैंगिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी बेळगाव शहरांमध्ये आज रविवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीतील 300 हून अधिक तृतीयपंथीयांचा सहभाग साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होता.
आम्हीही समाजाचा एक भाग आहोत. आम्हालाही इतरांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असा उद्घोष करत तृतीयपंथीयांच्या न्याय हक्कांबाबत जागृती करण्यासाठी आज रविवारी सकाळी शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
तृतीयपंथीयांच्या हक्कांबाबतचा मजकूर लिहिलेले फलक हातात घेऊन तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभाग दर्शवला होता. शहरातील किल्ला तलावा नजीकच्या अशोक सर्कल येथून फीत कापण्याद्वारे रॅलीचा शुभारंभ झाला. त्यानंतर सीबीटी, मार्केट पोलीस स्टेशन, संगोळी रायण्णा सर्कल, एसपी ऑफीस मार्गे केपीटीसीएल सभागृह येथे या रॅलीची सांगता झाली.
यावेळी बोलताना संघटनेच्या जिल्हाप्रमुख त्या किरण बेडी यांनी लैंगिक अल्पसंख्यांक समाजाला शासनाच्या सुविधा कोणत्याही अडथळ्याविना उपलब्ध झाल्या पाहिजेत. तृतीय पंथीय देखील समाजाचा एक अविभाज्य भाग असून इतरांप्रमाणे समाजात सन्मानाने जगण्याचा त्यांनाही अधिकार आहे.
त्यांची कोणी कुचेष्टा किंवा उपेक्षा करू नये. याबाबत जनजागृती करण्यासाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले. तृतीयपंथीयांच्या आजच्या या रॅलीत शहरासह जिल्ह्यातील सुमारे 300 हून अधिक तृतीयपंथीयांनी भाग घेतला होता. रॅलीच्या अग्रभागी कांही तृतीयपंथीय वाद्यवृद्याच्या तालावर नृत्य देखील करत होते. रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.