Sunday, May 5, 2024

/

राज्योत्सव मिरवणूक : प्रशासनाचा नाकर्तेपणा कि बेशिस्तपणाचे उदाहरण?

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहराला विशिष्ट सांस्कृतिक वारसा आहे. बेळगावमध्ये शिवजयंती मिरवणूक असो किंवा गणेशोत्सवाची मिरवणूक… प्रत्येक मिरवणुकीची विशिष्ट अशी शिस्त असते. या मिरवणुकीतून सांस्कृतिक वारसा जपला जातो. या मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीला, परंपरेला अनुसरून सर्व गोष्टी केल्या जातात. गणेशोत्सवाची मिरवणूक तर तब्बल २४ तासाहून अधिक काळ सुरु असते. या मिरवणुकीत देखील डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकते मात्र बेळगावमधील राज्योत्सव मिरवणूक या साऱ्या गोष्टींसाठी अपवाद ठरत आहे.

बेळगावमधील ऐतिहासिक शिवजयंती उत्सवादरम्यान २ महिन्यांपूर्वी उत्सव आणि मिरवणुकीसंदर्भात पूर्वनियोजनासाठी बैठका घेतल्या जातात. मिरवणुकीचा मार्ग ठरवला जातो. मिरवणुकीच्या शिस्तीबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांना सूचना दिल्या जातात. नियम ठरवून देण्यात येतात. शेकडो शिवजयंती उत्सव मंडळांचे चित्ररथ शिस्तपूर्वक मिरवणुकीत दाखल होतात. इतकी सारी पराकाष्ठा करूनही प्रशासन कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांना वेठीला धरते. येनकेन प्रकारे मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यात येतो. मात्र राज्योत्सव मिरवणुकीसंदर्भात प्रशासन गप्प का? असा सवाल सारेच बेळगावकर उपस्थित करत आहेत.

मंगळवारी बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या राज्योत्सव मिरवणुकीत केवळ धुडघूस, हुल्लडबाजी आणि हिडीस नृत्य करणाऱ्या तरुणाईचा धांगडधिंगा पाहता आला. कर्नाटकातील अनेक शूर वीरांच्या प्रतिमांसमोर हिडीस नृत्य करून संपूर्ण शहराला वेठीला धरण्याची हि कोणती संस्कृती आहे? क्रांतिवीर संगोळी रायन्ना, वीर राणी कित्तूर चन्नम्मा, वंकि ओब्बाव्वा, बेळवडी मल्लम्मा यासारख्या अनेक शूरवीरांच्या प्रतिमांसमोर सुरु असलेला धुडघूस हा कोणत्या संस्कृतीचे प्रतीक आहे? असा सवाल काल संपूर्ण शहरात उपस्थित केला जात होता.

 belgaum

रस्त्यांवरून सुसाट वेगाने हातात लाल – पिवळा घेऊन फिरविण्यात येणारी वाहने, कानठळ्या बसविणारा डॉल्बीचा आवाज, हिडीस पद्धतीने नाचणारी तरुणाई, हुक्केरी हिरेमठाच्या जेवणाच्या मेजवानीसाठी उडालेली झुंबड हे राज्योत्सव मिरवणुकीसाठी भूषणावह आहे का? या प्रश्नावर प्रशासनाने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

बेळगावमध्ये होणारे प्रत्येक सण – उत्सव हे शिस्त पाळून केले जातात. शिवजयंती असो किंवा गणेशोत्सव.. इतकेच नाही तर दसऱ्याच्या सीमोल्लंघनावेळी बेळगावमध्ये कुंतीमाता रथयात्रा, पालखी महोत्सव, दरवर्षी आयोजिली जाणारी जगन्नाथ रथयात्रा या साऱ्या मिरवणुकीत शिस्तबद्धता पाळून ठरवलेल्या मिरवणूक मार्गावरूनच मिरवणूक मार्गस्थ होते. मात्र कालचे चित्र हे संपूर्ण बेळगावकरांना डोकेदुखीचे ठरले. प्रत्येक गल्ली – बोळ – शहरातील प्रमुख मार्ग या साऱ्या रस्त्यांवर गर्दीच्या आणि मिरवणुकीच्या बेशिस्तपणाचे दर्शन घडले. गल्ली-बोळात बॅरीकेड्सने अडविलेल्या मार्गामुळे आणि ठिकठिकाणी बेदरकारपणे सुरु असलेल्या हिडीस मिरवणुकीमुळे वाहनचालक मात्र मेटाकुटीला आले. अनेक ठिकाणी व्यावसायिकांना मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणाईमुळे नुकसान सहन करावे लागले असून चन्नम्मा चौकातील ब्रँडेड शोरूम परिसराची नासधूस देखील झाल्याचे समोर आले आहे.Rajyotsav

राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कोर्ट आवार, चव्हाट गल्ली, कृष्णदेवराय सर्कल ते नव्या मनपाचा मार्ग, आरटीओ सर्कल, खडेबाजार, काकतीवेस रोड, किर्लोस्कर रोड, ग्लोब थिएटर परिसर, धर्मवीर संभाजी चौक ते यंदेखूट परिसर, सदाशिव नगर यासह ज्या ज्या ठिकाणी मिरवणुकीचा धुडघूस सुरु होता, त्या त्या ठिकाणी अनेक रुग्णालये होती.

मात्र या परिसरात डॉल्बीच्या डेसिबलचा विचार ना कन्नड कार्यकर्त्यांना आला आणि ना प्रशासनाला..! नेहमी डॉल्बीच्या नावाने नियम आणि अटी सांगणाऱ्या प्रशासनाने काल कानाचे पडदे पोलादाचे केले होते का? या मिरवणुकीसाठी आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्यांसाठी कोणते नियम प्रशासनाने ठरविले नव्हते का? असा सवाल देखील उपस्थित होते आहे. बेळगावमधील मुख्य चौकांपैकी एक असणाऱ्या राणी चन्नम्मा चौकापासून बीम्स इमारतीपर्यंत सुरु असलेल्या डॉल्बीच्या दणदणाटामुळे रुग्णांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच न केलेली बरी!

नियम आणि अटींची लांबलचक यादी सांगणाऱ्या प्रशासनाने राज्योत्सव मिरवणुकीबाबत मौन का पाळले? कि प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले? हे प्रश्न दरवर्षीच अनुत्तरित रहात आहेत. बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेतलेल्या पोलिसांना देखील या धुडगुसावर नियंत्रण मिळवता आले नाही हे पोलीस विभागाचे अपयशच म्हणावे लागेल. बेळगावमध्ये अशा पद्धतीने हुल्लडबाजी करून उत्साह आणि उत्सवाच्या नावावर बाहेरून आलेल्यांनी बेळगावच्या संस्कृतीला धक्का पोहोचविण्याचे काम नक्कीच केले आहे. या साऱ्या गोष्टींवर , जबाबदारी ओळखून प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे, कायदे, नियम, अटी सर्वांसाठी समान आहेत हे सिद्ध करावे, तसेच बेळगावच्या नावाला गालबोट लागू नये याचीही दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा बेळगावकर व्यक्त करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.