मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल तालुका म. ए. समितीचे नेते आर. आय. पाटील यांचा कारखान्याच्या संचालक मंडळातर्फे नुकताच सत्कार करून स्वागत करण्यात आले.
काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या कार्यालयात झालेल्या या सत्कार व स्वागत समारंभाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार हे होते. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर चेअरमन पोतदार आणि कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास यांच्या हस्ते नूतन संचालक आर. आय. पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अविनाश पोतदार यांनी आर. आय. पाटील यांच्या कारखान्याची निगडित आजपर्यंतच्या स्तुत्य कार्याची थोडक्यात माहिती देऊन प्रशंसा केली. सामाजिक कार्याची आवड असणारे पाटील मार्कंडेय कारखान्याच्या हितासाठी झटणारे व्यक्तिमत्व असून यापुढेही आम्हाला त्यांचे सहकार्य असेच मिळत राहावे असे सांगून पोतदार यांनी आर. आय. पाटील यांचे सहर्ष अभिनंदन व नूतन संचालक म्हणून स्वागत केले. यावेळी संचालक मनोहर हुक्केरीकर यांनी देखील पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या.
सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त करून नूतन संचालक आर आय पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे भले व्हावे यासाठी आपण सर्वांनी कारखान्याच्या माध्यमातून यापुढेही कार्यरत राहूया. आपला हा भाग सुपीक जमिनीचा असून येथे उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. हा स्थानिक ऊस जर आपल्या कारखान्याकडे आला तर कारखान्याची आणि पर्यायाने शेतकऱ्यांची अधिक भरभराट होऊ शकते. यासाठी स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मार्कंडेय साखर कारखान्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आम्हाला प्रथम शेतकऱ्याला सुखी पाहायचे आहे, शेतकरी सुखी तर समाज सुखी, असे सांगून कारखान्याच्या हितासाठी आपण आवश्यक सर्व सहकार्य करणार असल्याची ग्वाही आर. आय. पाटील यांनी दिली.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी मिनू पाटील, संचालक अनिल कुट्रे, लक्ष्मण नाईक, भाऊराव पाटील, राजकट्टी, नीलिमा पावशे, वसुंधरा म्हाळोजी, परशराम कोलकार आदी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.