बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विकास कामांना जोर आला असून आता विकास कामाचा एक भाग म्हणून येथील जवळपास 150 वर्षे जुने झाड तोडण्याचा विचार सुरू आहे. मात्र याला वकील संघटनेसह वृक्षप्रेमींनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
बेळगाव येथे येत्या 19 डिसेंबर पासून विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार असून त्याआधी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विकास कामे पूर्ण केली जाणार आहेत.
त्या अनुषंगाने सध्या येथील मुख्य रस्त्याचे नव्याने बांधकाम सुरू असून त्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. आता विकास कामांचा एक भाग म्हणून येथे असलेला प्रचंड मोठे झाड तोडण्याचा विचार सुरू आहे. सदर झाड सुमारे 150 वर्षे जुने असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात असून पर्यावरणाचा तोल सांभाळणारी अशी झाडे शहरात दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे बेळगाव वकील संघटनेसह पर्यावरण वृक्ष प्रेमींनी सदर डेरेदार झाडाची कत्तल करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.
शाश्वत विकास कामे ही झालीच पाहिजेत त्याला आमचा विरोध नाही. मात्र त्यासाठी जुनी बळकट झाडे तोडली जाऊ नयेत. ती वाचवण्यासाठी पर्यायी उपाय शोधण्यावर भर दिला गेला पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील संबंधित प्रचंड झाड मोठ्या झाडाच्या बाबतीत देखील तसा विचार केला गेला पाहिजे.
हे झाड गेले कित्येक वर्षे उन्हा -पावसात नागरिकांना निवारा देण्याचे काम करण्याबरोबरच महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाचा समतोल सांभाळत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मनात आणले तर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात विकास कामे राबविणारे अभियंते सदर भले मोठे झाड वाचवू शकतात.
कल्पकता लढवून त्या झाडाचा आवारातील सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीने उपयोग होऊ शकतो. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार केला जावा. तसेच सदर शतायुषी झाडाची कोणत्याही परिस्थितीत विकासाच्या नावाखाली कत्तल केली जाऊ नये, अशी जोरदार मागणी केली जात आहे.