बेळगाव महापालिकेने शहरातील वाहन चालकांना दिलासा देताना आपल्या वाहन तळांवरील पार्किंगच्या शुल्कात कपात केली आहे. आता मनपा वाहनतळांवर पार्किंग करिता दर 3 तासाला 30 ऐवजी 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
बेळगाव महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील बापट गल्ली, क्लब रोड व एपीएमसी रोड वरील वाहन तळाच्या ठिकाणी पार्किंग शुल्क वसुलीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला नव्यादराने शुल्क वसुली करावी लागणार आहे. बापट गल्ली व क्लब रोडवरील वाहनतळावर दुचाकी पार्किंग सुविधा नाही.
एपीएमसी रोडवरील व्यापारी संकुलात जो नवा वाहनतळ तयार केला आहे. त्या ठिकाणी दुचाकी पार्किंग सुविधा आहे. तेथे दुचाकीसाठी दर तीन तासाला 10 रुपये पार्किंग शुल्क निश्चित करण्यात आले आहे. चार चाकी वाहनांसाठी पहिल्या 3 तासांसाठी 20 रुपये शुल्क आकारले जाईल. तीन तासापेक्षा जास्त काळ वाहन थांबले तर पुढील 3 तासासाठी पुन्हा 20 रुपये शुल्क भरावे लागेल. दुचाकी पार्किंगच्या बाबतीत देखील अशीच सूचना करण्यात आली असल्याची माहिती महापालिका महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेच्या वाहन तळांवर अनेक वर्षांपासून 30 रुपये पार्किंग शुल्क आकारले जात होते. मात्र त्याबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. क्लब रोडवरील पार्किंग शुल्क आकारणीबाबत महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या. तसेच शहरातील सर्वच वाहनतळांवर पार्किंग शुल्क कमी करण्याची मागणी झाली.
त्याची दखल घेत आयुक्तांनी पार्किंग शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही ठिकाणच्या पार्किंग शुल्क वसुलीचा ठेका एकाच व्यक्तीने घेतला आहे त्या माध्यमातून त्याला 62 लाख 80 हजार 757 रुपये निव्वळ उत्पन्न मिळणार आहे.