बेळगाव शहराचा आसपासचा परिसर व तालुक्यात सध्या सुगीचा हंगाम जोमात असून भात कापणीपासून भाताला वारे देण्यापर्यंत यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याचे पहावयास मिळत आहे. जुने बेळगाव शिवारामध्ये तर अत्याधुनिक विदेशी मशीनने भात कापणी सुरू आहे.
सध्या बेळगाव परिसरासह तालुक्यात सुगीचा हंगाम जोरात असून भात कापणी भात बांधणी आणि मळणीच्या कामाला वेग आला आहे. जुने बेळगाव शिवारामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचे भात कापणी मशीन दाखल झाले आहे.
या मशीनद्वारे झटपट भात कापणी होताना पहावयास मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर परदेशी बनावटीचे असून त्याद्वारे भात कापणी झटपट सुरळीत उरकली जात आहे.
सदर मशीनद्वारे एका एकरातील उभे भात पीक अवघ्या दीड -दोन तासात कापून पोत्यात भरून रेडी ठेवले जात आहे. कोल्हापूर येथून खास मागवण्यात आलेल्या या मशीनचे भाडे एकरी 8000 रुपये इतके आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या हे भात कापणी मशीन चर्चेचा विषय झाले आहे.
भात कापणीपासून भाताला वारा देण्यापर्यंत यंत्राचा वापर वाढल्यामुळे श्रम आणि वेळेची बचत होत असली तरी पैसा मात्र जादा जात आहे. परिणामी त्यातल्या त्यात सधन शेतकरीच आधुनिक यंत्राचा वापर करत असून लहान शेतकऱ्यांसाठी ही बाब न आवाक्या बाहेरची ठरत आहे.
तरीही शिवारात सर्वत्र सुगीच हंगामाची धांदल सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. तथापि एकंदर परिस्थिती पाहता यांत्रिकीकरणामुळे बेळगाव परिसरातील पारंपरिक भात कापणीसह भात बांधणी, भाताला वारे देणे आणि मळणीची पद्धत आता नामशेष होण्याच्या मार्गाला लागली आहे, हे मात्र निश्चित.