यंदा बेळगाव तालुक्यात भात पीक जोमात आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने बेळगाव तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात सुगी हंगामाची धांदल उडाली असून भात कापणीला वेग आला आहे.
बेळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या हंगामात तालुक्यात हजारो हेक्टरमध्ये भात पेरणी झाली आहे. यावर्षी तालुक्यात झालेला चांगला पाऊस भात पिकाला उपयुक्त ठरला आहे. गेल्या कांही दिवसांपासून पावसाने उघडीत दिल्यामुळे तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात भात कापणीच्या सुगी हंगामाची धांदल उडाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधावर व्यस्त असल्याचे चित्र दिसून येतात आहे.
भात कापणीच्या सुगीने जोर धरला असला तरी कापणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग घरातील सर्व कुटुंबीयांना सोबत घेऊन भात कापणी करताना दिसत आहे. तसेच कांही ठिकाणी मळणी देखील उरकून घेतल्या जात आहेत. गेल्या पंधरवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे भात कापणी अडकून पडली होती. आता पावसाने उघडीत दिल्यामुळे सुगी हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.
दरम्यान, सुगी हंगामाला सुरुवात झाल्यामुळे कृषी खात्याने भात खरेदी केंद्रे सुरू करावीत अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. बेळगाव तालुक्यातील भात क्षेत्रात अलीकडे वाढ झाली असल्यामुळे उत्पादनात साहजिकच वाढ होत आहे. मात्र भाताला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
शासनाने जिल्ह्यात भात केंद्रे सुरू करून भाताची खरेदी करावी अशी मागणी होत आहे. सध्या कापणी बरोबर मळणी हंगामाला ही प्रारंभ झाला आहे. परिणामी भात उत्पादन सुरू झाले असले तरी भाताची विक्री कोठे करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने भात खरेदी केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.