बेळगाव शहरातील कृष्णदेवराय सर्कल अर्थात कोल्हापूर सर्कल येथील रस्त्याशेजारी फूटपाथवर उघड्यावर असलेल्या धोकादायक इलेक्ट्रिक फ्युज व मीटर बॉक्सकडे हेस्कॉमने तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहरातील कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून रामदेव हॉटेलच्या दिशेने जाणाऱ्या डॉ आंबेडकर मार्गावर कोल्हापूर सर्कलच्या ठिकाणी फूटपाथवर भूमिगत वीज वाहिन्यांचे कनेक्शन असलेला फ्युज व मीटर बॉक्स आहे. जमिनीपासून फूटभर उंचीवर बसवण्यात आलेल्या या बॉक्सचे झाकण खुले असल्यामुळे आतील मीटर, फ्युजा, इलेक्ट्रिक कनेक्शन सर्वकाही उघड्यावर पडले आहे.
सदर सर्कलमध्ये भिकाऱ्यांचाही वावर असतो. त्यांच्यापैकी काहीं बरोबर लहान मुलेही असतात. फूटपाथवरून ये -जा करणारे पादचारी त्या बॉक्सकडे फिरणार नसले तरी भिकाऱ्यांच्या लहान मुलांसाठी तो धोकादायक ठरू शकतो.
अजान लहान मुले खोडकर असतात त्यामुळे एखाद्या मुलाने त्या इलेक्ट्रिक कनेक्शन असलेल्या बॉक्स सोबत खेळण्याचा प्रयत्न केल्यास अनर्थ घडू शकतो. सदर बॉक्सचे खुले असलेले झाकण मण्णूरचा सामाजिक कार्यकर्ता सचिन मंडोळकर याने व्यवस्थित जागच्याजागी बसवण्याचा प्रयत्न केला.
मात्र बरेच प्रयत्न करून देखील झाकण न बसल्याने त्याने तो नाद सोडून दिला. तरी हेस्कॉमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या धोकादायक इलेक्ट्रिक फ्युज व मीटर बॉक्सचे झाकण व्यवस्थित बसविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.