बेळगाव : कर्नाटकातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या बेळगाव विमानतळावर लवकरच एमआरओ सुविधा उपलब्ध होणार आहे.बेळगाव विमानतळावर आणखी एका सुविधेत यामुळे मोठी भर पडणार आहे.
एव्हिएशन कनेक्टिव्हिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि. नवी दिल्ली या कंपनीला हँगर आणि ऍप्रॉनसाठी जागा देण्यात आली असून ERJ145, Legacy 650, Falcon7x, Challenger 605 आदी प्रकारच्या विमानाची देखभाल यामार्फत होणार आहे.
एमआरओ या सुविधेअंतर्गत विमानाची संपूर्ण देखभाल करण्यात येते. विमानाची देखभाल, विमानाच्या भागाची सुनिश्चित तपासणी, दुरुस्ती, बदली, दोष सुधारणे, हवाई योग्यतेच्या निर्देशांचे पालन करून बदल आणि दुरुस्ती करणे अशा सुविधा एमआरओ अंतर्गत पुरविल्या जातात.
बेळगाव विमानतळावरील प्रवासी आणि उड्डाणे वाढल्याने बेळगाव विमानतळावर एमआरओ ची मोठी आवश्यकता होती. कोणत्याही विमानतळाच्या वाढीसाठी दीर्घकाळासाठी अशी सुविधा गरजेची असते. यामुळे छोटे-मोठे व्यत्यय दूर होऊ शकतात शिवाय या सुविधेमुळे उड्डाण रद्द होणेही टाळले जाऊ शकते.