बेळगाव लाईव्ह विशेष : मराठी भाषिकांच्या जीवावर महाराष्ट्रात मंत्रिपद उपभोगणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांना बेळगाव आणि येथील मराठी भाषिकांबद्दल कधीच आपुलकी जाणवली नाही. मात्र गोकाक येथील कार्यक्रमात कन्नड धार्जिणे गीत गायन असो किंवा बेळगावमध्ये आयोजित केलेला एका खाजगी संस्थेचा कार्यक्रम असो याबाबत मात्र तत्परता दाखविणाऱ्या चंद्रकांतदादांना बेळगाव दौऱ्यावरून बेळगावकरांनी ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून कानपिचक्या दिल्या होत्या.
बहुधा याची दखल घेत कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे गुप्तहेर यांच्या माध्यमातून चंद्रकांत दादांना देण्यात आलेल्या सूचनेवरून त्यांनी आपला बेळगावदौरा रद्द केल्याची चर्चा सुरु आहे.
सीमाप्रश्नी सोमवारी उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. या समितीमध्ये चंद्रकांत पाटील यांचाही समावेश असून त्यांचे कर्नाटक प्रेम पाहून कदाचित त्यांना महाराष्ट्र सरकारकडून सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. याशिवाय ‘बेळगाव लाईव्ह’ वर त्यांच्या बेळगाव दौऱ्यावरून केलेल्या वृत्तांकनाचा परिणाम म्हणून चंद्रकांतदादांनी बेळगावचा दौराच रद्द केल्याची चर्चा सीमाभागात रंगत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात पाच वर्षे सीमा समन्वयक मंत्री म्हणून कार्यरत असणारे चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये कधी पाऊलही टाकले नाही. मात्र कर्नाटकात कन्नड धार्जिण्या कार्यक्रमात त्यांनी दाखविलेले कर नाटकी प्रेम यावरून मराठी भाषिकांमध्ये तीव्र असमाधान व्यक्त करण्यात येत होते.
बेळगावमध्ये मराठी भाषिकांसमवेत एक बैठक देखील न घेतलेल्या चंद्रकांत पाटलांनी सीमावासीयांशी अंतर्गत शत्रुत्व पत्करल्याची चर्चाही सीमाभागात जोरदार सुरु आहे. महाराष्ट्रातील घातकी राजकारणी म्हणून परिचित असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या नीतिमत्तेवरून नेहमीच ताशेरे ओढण्यात येतात. सीमा समन्वयक मंत्री पदाच्या कारकिर्दीत मराठी भाषिकांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आताच बेळगाव का आठवले? असा प्रश्न देखील सीमावासीय उपस्थित करत आहेत.
त्यांच्या बेळगाव दौऱ्यादरम्यान त्यांना सीमावासियांच्या रोषाला सामोरे जावे लागणार याची चाहूल त्यांना लागल्यामुळे त्यांनी बेळगाव दौरा रद्द केल्याचीही चर्चा जोरदार सुरु आहे.